व्यावसायिकावर गोळीबार प्रकरण; सहा जण अटकेत

ठाणे : बहिणीला भावजी मारहाण करतात तसेच त्यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने इस्माईल मांडेकर याने बहिणीच्या पतीच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने इस्माईल याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.

इस्माईल मांडेकर (२९), मुनवर शेख (३२), इर्शाद कुरेशी (२८), शैबाज पोके (२४), अफताब शेख (१९) आणि निहाद करेल (२८) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याण येथील वालधुनी भागात २९ ऑक्टोबरला एका ३९ वर्षीय व्यावसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्याचा प्रकार उघडकीस झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर या प्रकरणाचा समांतर तपास खंडणीविरोधी पथकाकडून सुरू होता. दरम्यान, यातील काही आरोपी ठाण्यातील राबोडी भागात राहत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मुनवर, इर्शाद, शैबाज आणि अफताब याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. तसेच निहाद याच्या सांगण्यावरून आपण हा गोळीबार केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी निहादला ताब्यात घेतले. इस्माईल मांडेकर याने हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती निहादने दिली. यानंतर पोलिसांनी इस्माईल यालाही ताब्यात घेतले.

या व्यावसायिकाचे इस्माईलच्या बहिणीसोबत १५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. बहिणीपासून सुटका मिळावी यासाठी तो तिला मारहाण करत होता. त्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली इस्माईलने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहाही जणांना अटक केल्याची माहिती उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

वालधुनी येथे संधी साधून मुनवर आणि इर्शाद हे दोघेही दुचाकीने आले. त्यानंतर मुनवरने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या हातावर, तर दुसरी गोळी त्यांच्या मांडीवर लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.