दीपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सगळीकडे ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मोठय़ा मोठय़ा बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीनिमित्ताने लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी बाजार पेठेत केल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

बाजारात कपडे, फराळ, कंदील, पणत्या, रांगोळी, सुगंधी आयुर्वेदिक उटणे, मध, आयुर्वेदिक औषधे व विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, घरगुती पदार्थ, अनेक महिलांनी घरी बनवलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. या वस्तू खरेदीसाठी मोठय़ा संख्येने ग्राहकांनी मोठी गर्दी करू लागले आहेत.

यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी जास्त प्रमाणात घरगुती बनवलेले पदार्थ आणि शोभेच्या वस्तू यांना प्राधान्य दिले आहे. त्यासाठी वसई-विरार शहरातही अनेक ठिकाणी महिला बचत गटाच्या वतीने अशा प्रकारच्या बाजारपेठांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व काही वस्तू दिवाळीच्या निमित्ताने मिळू लागल्याने सामान्य ग्राहकांनीही समाधान व्यक्त केले आहे. विरारमध्ये स्वयंप्रेरित आणि स्वयंप्रेरणा या महिला बचत गटानेही अशाच प्रकारे सिटी फेअर शॉपिंग कार्निव्हलचे आयोजन केले आहे. त्यामुळे घरगुती पदार्थ व इतर वस्तू बनवणाऱ्या महिलांना चांगल्या प्रकारे रोजगाराची संधी मिळाली आहे.

अनेक महिलांनी उद्योग क्षेत्रात येऊन आपल्या घरी बनवलेले पदार्थ आणि वस्तू ग्राहकपेठेत आणून विक्री करावी. ज्यामुळे महिलाही आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील आणि त्यांनाही नवी उमेद मिळेल. या उद्देशाने वेगवेगळ्या सण-उत्सवात अशा प्रकारच्या बाजारपेठा भरवल्या जात जातील.

– अरुंधती ब्रह्मकुमारी, अध्यक्षा, महिला बचत गट