लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली :  कल्याण शिळफाटा, पत्रीपूल रस्त्याने डोंबिवलीत रिजन्सी अनंतम प्रवेशद्वारासमोरून डोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या वाहनांना सुरुवातीलाच रस्त्यावरील चढ अडचणीचा ठरत आहे. चढ असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होताना अडथळा येतो. गेले दीड महिने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या वेळी या रस्त्यावरील चढ काढून टाकण्यात येणार आहे.

पावसाळ्यात या उंचवटय़ामुळे पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने हा रस्ता जलमय होतो. रस्त्यावरील पाणी परिसरातील बंगल्यांमध्ये शिरते. वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून वाहन चालवावे लागते. दीड महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिळफाटा अंतर्गत रस्ता ते घरडा सर्कल काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. हे काम सुरू असतानाच वाहने चालविताना अडथळा ठरणारा उंचवटा रस्ता सपाट करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता पराळे राव यांच्याकडे विचारणा केली असता, शिळफाटा रस्त्याने डोंबिवलीत येणारी वाहने वळण घेत असतात. उंचवटा रस्ता तात्काळ काढला तर प्रवेशद्वारावर वाहन कोंडी होईल. त्यामुळे हे काम काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आल्यावर शेवटच्या टप्प्यात उंचवटा सपाट करुन तेथे एकसारखा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

डोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील चढ अडचणीचा ठरत आहे.