ठाणे ग्रामीणमधून वगळून नवीन परिमंडळ करण्याचा प्रस्ताव
मुंबई शहराला खेटूनच असलेल्या मीरा-भाईंदरचे गेल्या काही वर्षांत संपूर्ण नागरीकरण झाले असले तरी ही शहरे आजही ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयात मीरा-भाईंदर ही शहरे जोडून नवे परिमंडळ करण्याचा प्रस्ताव पुन्हा नव्याने पुढे आला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे.
मीरा-भाईंदरचे मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाले असले तरी ही शहरे आजही ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रात येतात. या शहराकरिता मीरारोड, भायंदर, नवघर, काशिमीरा आणि उत्तन अशी पाच पोलीस ठाणी आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होण्यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलिसांचे क्षेत्र मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, डहाणू असे होते. मात्र, विभाजनानंतर मीरा-भाईंदर वगळता वसई-विरार, पालघर, डहाणू आदी परिसराचा पालघर जिल्ह्य़ात समावेश झाला. त्यामुळे या विभागासाठी पालघर जिल्ह्य़ासाठी स्वतंत्र पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली. तसेच मीरा-भाईंदर शहराचा ठाणे जिल्ह्य़ात समावेश झाल्यामुळे ते ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतच ठेवण्यात आले. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्राची रचना पाहता विविध परिसर एकमेकांपासून जवळजवळ आहेत. मात्र या परिसरापासून मीरा-भाईंदर हे दूर अंतरावर असून ते कार्यक्षेत्रामध्ये एकाकी पडल्याचे दिसून येते. त्यामुळे या विभागाचा कार्यभार सांभाळताना ग्रामीण पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान मीरा-भाईंदर परिसराचे संपूर्णपणे शहरीकरण झाले असून हा परिसर मुंबई तसेच ठाणे शहराला खेटून आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाचा पसारा मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये या शहरांचा समावेश करणे शक्य नाही. यामुळे ही शहरे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी पुढे आला होता. त्याचवेळी वसई-विरार विभागासाठी स्वतंत्र नवे पोलीस आयुक्तालय आणि त्यामध्ये मीरा-भाईंदर शहराचा समावेश करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. यामुळे या दोन्ही प्रस्तावांवर निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र जिल्हा विभाजनामुळे वसई-विरार या शहरांचा पालघर तर मीरा-भाईंदर शहराचा ठाणे जिल्ह्य़ात समावेश करण्यात आला आहे. यामुळे ही शहरे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य शासनाच्या गृह विभागाकडे पाठविला आहे. या वृत्तास ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दुजोरा दिला. तसेच या शहरांसाठी स्वतंत्र परिमंडळ स्थापन करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहर आयुक्तालयाचा विस्तार वाढणार
ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली भिवंडी तसेच कल्याण शहरातील काही भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात जोडण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये भिवंडी तालुका, कल्याणमधील टिटवाळा तसेच अन्य परिसराचा समावेश आहे. याशिवाय, पोलीस आयुक्तालयातील भिवंडी परिमंडळ तसेच वाहतूक विभागाच्या विभाजनाचाही प्रस्ताव आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.