गेल्या पाच वर्षांपासून गटशिक्षण अधिकारी आशिष झुंझारराव हे छळ करत असल्याचा आरोप शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील एका महिला अधिकाऱ्याने केला आहे. कार्यालयात कोणतेही काम न देणे, नाहक बसवून ठेवणे, पैशांची मागणी करणे, तसेच अश्लील वक्तव्य करून शरीर सुखाची मागणी करून गटशिक्षण अधिकारी मानसिक आणि लैंगिक छळ करत असल्याचे संबंधित महिला अधिकाऱ्याने शहापूर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पाच वर्षांपासून सुरु असलेल्या या मानसिक त्रासामुळे त्रस्त झालेल्या महिला अधिकाऱ्याने यापूर्वी शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तिथून न्याय मिळत नसल्याने अखेर सोमवारी संध्याकाळी महिलेने शहापूर पोलिसांकडे धाव घेऊन गटशिक्षण अधिकारी झुंझारराव यांच्या विरोधात तक्रार केली, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली.

याप्रकरणी झुंझारराव यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या झुंझारराव यांचा शहापूर पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी टी. ओ. चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर शिक्षणाधिकारी श्रीमती भागवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.