डॉ. तात्याराव लहाने यांचा सल्ला ; उपकरणांबाबत धोक्याचा इशारा
दिवाळीमध्ये फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असून अस्थमा आणि फुप्फुसाच्या रोगांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांनी फटाक्यांपासून दूर रहावे, असा सल्ला नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी शनिवारी कल्याण येथील कार्यक्रमात दिला. फटाके फोडताना झालेल्या हलगर्जीतून दर वर्षी दिवाळीत २५ मुले अंधत्त्व घेऊन माझ्याकडे येतात, असे लहाने या वेळी म्हणाले. कल्याणातील सुभेदारवाडा कट्टय़ावर ‘डोळे आणि आरोग्याची निगा कशी राखावी’ या विषयावर ते बोलत होते.
माणसाला चष्मा नैसर्गिक आणि अनैसर्गिक गोष्टींमुळे लागत असतो. दिवसेंदिवस चष्मा लागणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. डोळ्यातील बाहुली प्रसरण आणि आकुंचनाचे काम नियमितपणे करीत असते. डोळ्यावर प्रकाश पडल्यानंतर डोळ्यातील बाहुली आकुंचन पावते. ६ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या हाती मोबाईल, टॅब अशी विद्युत उपकरणे देऊ नयेत. त्याचप्रमाणे वय वर्ष सहा ते बारा वयोगटादरम्यान असलेल्या मुलांनी दिवसातून केवळ दोन तास ही उपकरणे वापरावीत. बारा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांनी दोन तासांहून अधिक काळ विद्युत उपकरणे वापरण्यास हरकत नाही, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.
डोळ्याला काजळ, सुरमा, गुलाबपाणी, आय-कुल अशा गोष्टी लावू नयेत, असे ते म्हणाले. काजळ, सुरमा डोळ्याला लावल्याने डोळे मोठे होत नाहीत. उलट त्यामुळे डोळे लहान होतात. डोळ्याला काजळ लावल्याने लहान मुलांना ‘खुपळ्या’ नावाचा रोग होतो. डोळे स्वच्छ राहण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ थंड पाण्याने धुणे गरजेचे आहे. डोळ्याला सतत हात लावणाऱ्या नागरिकांना ‘नास्रु’ नावाचा आजार जडतो. नाकाच्या बाजूला सुज येते, असे ते म्हणाले. डोळ्याला ‘अ’ जीवनसत्त्व मिळणे गरजेचे असून ते मिळण्यासाठी गाजर, शेवग्याची शेंग, मासे, पपई आदी पदार्थ खाणे गरजेचे आहे. काचबिंदू हा आजार लहान मुलांनाही होऊ शकतो. यामुळे प्रत्येकाने डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.