ठाणे महापालिका निवडणूक प्रचारावरून झालेल्या वादातून शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार शनिवारी रात्री सावरकरनगर भागात घडला. याप्रकरणी भाजपचे उमेदवार विलास कांबळे, विद्यमान नगरसेवक राजकुमार यादव आणि मुंबई-ठाण्यातील कुख्यात गुंड मयूर शिंदे या तिघांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

ठाणे येथील सावरकरनगर भागात पीडित महिला राहत असून ती शिवसेनेची स्थानिक पदाधिकारी आहे. शनिवारी मध्यरात्री निवडणूक प्रचारावरून तिघांसोबत तिचा वाद झाला. त्यावेळेस या तिघांनी तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्या सर्वानी आरोपींवर कारवाई करण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार विलास कांबळे, राजकुमार यादव आणि मयूर शिंदे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कुख्यात गुंड मयूर शिंदे याने काही दिवसांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. मात्र, मयूरचा पक्षप्रवेश झाला नसल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. असे असतानाच शिवसेना महिला पदाधिकारीला मारहाण व विनयभंगप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्य़ात भाजप उमेदवार व नगरसेवकासोबत मयूर याचे नाव पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.