ऋषीकेश मुळे

अवघ्या नऊ महिन्यांत रस्ता उंच-सखल

चार महिन्यांहून अधिक काळ अहोरात्र दुरुस्ती करूनही नव्या कोऱ्या मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याची अवघ्या नऊ महिन्यांतच दुरवस्था झाली असून या मार्गावरील ठाणे दिशेकडील उड्डाणपुलावरील रस्ता उंच-सखल झाल्याने या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. वाढते तापमान आणि उतरण असलेल्या पुलावर वाहनांचे ब्रेक लागण्याचे प्रमाण अधिक असल्याने हा रस्ता उंचसखल झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी केला आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून सुरू असते. या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याची बाब पुढे येताच गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या अखेरीस येथील कामास सुरुवात करण्यात आली. या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले होते. दरम्यान विविध कारणांमुळे बाह्य़वळण मार्गाचे काम लांबणीवर पडून बाह्य़वळण मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू होण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागला. असे असताना या पुलाचे काम पूर्ण होऊन नऊ महिने उलटत नाही तोच बाह्य़वळणावरील ठाणे दिशेकडील पुलाची दुरवस्था झाल्याची बाब समोर आली आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्ग हा ६ किलोमीटर अंतराचा आहे. यापैकी ठाणे दिशेकडील पुलाचा भाग ६०० मीटर आहे. या पुलावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडून पुलाची दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात पुलावर साचणारे पाणी हे पुलाच्या खालील भागात झिरपत असते. यावर उपाययोजना म्हणून दुरुस्तीच्या काळात ‘वॉटर प्रूफ मेम्ब्रेन्स’ हे तंत्रज्ञान वापरून पुलावर डांबरीकरण करण्यात आले. जेणेकरून पुलावर साचणारे पाणी हे पुलाखालून झिरपू नये आणि पुलावरील विसर्ग वाहिन्यांतून बाहेर टाकले जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. हे काम पूर्ण होऊन वर्ष होत नाही तोच उड्डाणपुलावरील रस्ता उंच-सखल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना या मार्गावरून वाहन चालविणे जिकिरीचे जात असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात आले आहे.

वाढत्या तापमानामुळे मुंब्रा बाह्य़वळणाच्या ठाणे दिशेकडील उड्डाणपुलावरील डांबराची झीज झाली आहे. उड्डाणपूलही चढण आणि उतरणीवर असून या पूलावर जड-अवजड वाहनांचे ब्रेक दाबण्याचे प्रमाण अधिक आहे. या दोन गोष्टींमुळे पुलावरील रस्ता हा उंच-सखल झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना या मार्गावरील उड्डाणपुलाची दुरवस्था झाल्यामुळे पावसाळ्यात दुरुस्तीचे संकट उभे राहू शकते अशी चिन्हे आहेत. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.