News Flash

‘मुंब्रा बाह्यवळण’ चार महिने बंद?

वाहतूक पोलिसांचाही ताण वाढणार आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्गाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्ता उखडल्याने वाहनचालकांना येथून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागत आहे.

|| किशोर कोकणे

दुरुस्ती कामांसाठी निविदा काढण्याची तयारी; ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहरातील कोंडी वाढणार

ठाणे : उरण येथून जेएनपीटी बंदरातून ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंब्रा बाह्यवळण मार्गाची पुन्हा दुरवस्था झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. या मार्गावरील रेतीबंदर पुलावर मोठे खड्डे पडले असून या दुरुस्ती कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. ही निविदा मंजूर झाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या कामासाठी चार महिन्यांचा अवधी लागणार असून तोपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांचा भार वाढून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरात कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहने वाहतुकीसाठी मुंब्रा बाह््यवळण मार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्या मोठी आहे. मुंब्रा बाह््यवळण मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे तीन वर्षांपूर्वी हाती घेतले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कामाला चार महिने लागले होते. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे अवजड वाहनांचा भार वाढून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरात कोंडी होत होती. आता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मुंब्रा बाह््यवळण मार्गाच्या रस्त्याचे काम यापूर्वी करण्यात आले असले तरी, रेतीबंदर उड्डाणपुलाच्या ठिकाणी काम अद्याप करण्यात आलेले नाही. या पुलावर पावसाळ्यात दरवर्षी मोठे खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे मार्गावर अपघात झाले होते. या खड्ड्यांमध्ये वाहन अडकून बंद पडण्याचे प्रकारही घडतात. त्याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर होतो. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. हा विभाग या कामासाठी येणारा अंदाजित खर्च काढून त्याआधारे कामाची निविदा काढणार आहे. येत्या काही दिवसांत ही निविदा काढली जाणार आहे. निविदा मंजूर होताच हे काम सुरू होणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यात करण्याचीही विभागाची तयारी आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी हा मार्ग बंद ठेवावा लागणार आहे. या मार्गावरील वाहतूक ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई मार्गे वळवावी लागणार आहे. त्यामुळे या शहरांमध्ये अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचाही ताण वाढणार आहे.

इतर दुरुस्तीची कामे

या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या आत असलेल्या सळयादेखील बाहेर येतात. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यात तात्पुरती डागडुजी केली जाते. या पुलावरून दुचाकीचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या संदर्भात वाहनचालकांकडून ट्विटर तसेच समाजमाध्यमांवर टीकाही होत असते. या पुलावर आता काँक्रीटचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मार्गावरील इतर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:13 am

Web Title: mumbra bypass road closed for four months akp 94
Next Stories
1 पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी
2 बदलापुरात आरोग्य कर्मचारी कपात
3 सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांचा सावध पवित्रा
Just Now!
X