बाजारभावानुसार भाडे घेण्याचा प्रस्ताव

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेची जागा तात्पुरत्या स्वरूपात नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र, नाममात्र भाडय़ाऐवजी बाजारभावानुसार भाडे घेण्याचा तसेच गेल्या दोन वर्षांपासून जागेचा वापर केल्याबाबतही भाडे घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत घेतला. हा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीत कोटय़वधी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रवाशांचा भार वाढला आहे. रस्ते वाहतुकीवर वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कामगारांसाठी त्याच परिसरात एमएमआरडीएला वसाहत उभारायची आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डचीही उभारणी करायची आहे. यासाठी एमएमआरडीएने महापालिका प्रशासनाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने कोलशेत येथील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागा देण्याचा निर्णय घेतला होता.

यासंबंधीचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. मात्र, नाममात्र दराने जागा देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध करत त्या जागेचे भाडे बाजारभावानुसार घेण्याचा आग्रह नगरसेवकांनी धरला होता.  दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाने हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आणला. नाममात्र भाडय़ाऐवजी बाजारभावानुसार भाडे घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला.