प्राथमिक कामांसाठी पालिकेकडून १५ लाख रुपये मंजूर; भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार

बदलापूर : बदलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ  शकतो. त्यामुळेच पालिकेच्या मालकीचे नवे जलसाठे निर्माण करण्याचे काम कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या प्राथमिक कामांसाठी नुकताच पालिकेकडून १५ लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यातून चिंचवली धरणाची निर्मिती केली जाणार आहे.

बदलापूर शहर गेल्या काही वर्षांत किफायतशीर किंमतीतील घरांसाठी तसेच चाकरमान्यांसाठी चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. त्यामुळे बदलापूर शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढते आहे. बदलापूरची लोकसंख्या २०११ मध्ये १ लाख ७५ हजार होती. मात्र त्यानंतर वाढलेल्या शहरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून सध्या फक्त मालमत्तांचा आकडा एक लाखाच्या वर गेला आहे. त्यामुळे ही लोकसंख्या ३ लाखांच्या घरात गेल्याची शक्यता आहे. या लोकसंख्येला सध्याच्या घडीला उल्हासनदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला दररोज ४८ ते ५० दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाण्याची मागणी भागवण्यासाठी बॅरेज बंधारा कमी पडू शकतो. त्यामुळे पाण्याचा नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने चिंचवली, इंदगाव आणि शिरगाव या भागात पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी मोठा निधी लागणार असल्याने तसा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणालाही सादर केला होता. त्यानुसार हे धरण विकसित करायचे असल्यास त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याबाबत नगरपालिकेला कळवण्यात आले होते. त्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार किसन कथोरे, नगराध्यक्षा विजया राऊत, पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, पालिकेचे अभियंते उपस्थित होते. यात हे काम एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून ठेव तत्त्वावर हे काम करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच प्राथमिक कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चिंचवली साठवण तलावाची प्राथमिक कामे करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आली.

कर्जउभारणीसाठी ‘एमएमआरडीए’ची मदत

धरणाचे प्राथमिक सर्वेक्षण आणि अहवाल तयार करणे, मातीचे नमुने घेणे, धरणाचे काटच्छेद संकल्पनेसाठी संकल्पचित्र तयार करणे, वन जमीन प्रस्ताव तयार करून त्याला मान्यता देणे अशी कामे केली जाणार आहेत. पाण्याचा किती साठा होऊ  शकतो हेही या अभ्यासातून कळणार आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून कर्ज उभारून धरणाची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अभियंते निलेश देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे बदलापूर शहराच्या पाण्यासाठी नवा स्रोत निर्माण होणार असून त्याद्वारे भविष्यातील पाण्याची चिंता मिटणार आहे.