कल्याण-डोंबिवलीतील शाळांमधील विद्यार्थ्यांचे राजकीय अनास्थेमुळे नुकसान

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या टॅबचे वाटप गेल्या वर्षी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र एका वर्षांतच ७५ टक्के टॅब खराब झाले असून अद्याप ते दुरुस्तीसाठी नेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शाळा सुरूहोऊनही मुले अभ्यासावाचून वंचित असल्याचे चित्र कल्याण डोंबिवलीमधील शाळांमध्ये दिसत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा शालेय विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, त्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी त्यांना टॅब देण्यात आले होते. सत्ताधारी शिवसेनेने हा प्रयोग सर्वात प्रथम राबवत शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब वाटप केले. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपली पोळी भाजून घेतली. मात्र काही काळातच टॅब नादुरुस्त होण्याचे प्रकार घडू लागले. आता तर तब्बल ७५ टक्के टॅब नादुरुस्त आहेत. शाळांनी संबंधित कंपनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना टॅब दुरुस्तीसाठी नेण्याचे कळविले. मात्र आता जुलै महिना उजाडला तरी हे टॅब दुरुस्तीसाठी नेण्यात आलेले नाहीत. ऑगस्टपर्यंत टॅब दुरुस्त होतील. त्यानंतर मुलांच्या अभ्यासक्रमास सुरुवात होईल, असे एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

संभ्रमाचे वातावरण

आठवीच्या विद्यार्थ्यांना हे टॅब देण्यात आले होते. ती मुले आता नववीत गेली आहेत. त्यामुळे त्यांना देण्यात आलेल्या टॅबमध्ये नववीचा अभ्यासक्रम अपलोड करण्यात येणार आहे, की शाळेतील नव्याने आठवीच्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते टॅब द्यावे याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे, कारण टॅब हे वैयक्तिकदृष्टय़ा मुलांना देण्यात आले आहेत. शिवाय मुले हे टॅब घरी घेऊन जात असल्याने त्यांच्याकडून त्यांचा टॅब मागायचा कसा, असा प्रश्न शाळेतील शिक्षकांना पडला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला टॅब देण्यापेक्षा शाळांमध्ये टॅबलॅब सुरू केली असती तर ते  सोयीचे ठरले असते, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली. काही शाळांनी मात्र आठवीचा अभ्यासक्रम या टॅबमध्ये असल्याने आठवीच्या मुलांनाच तो दिला आहे. मात्र टॅब खराब होण्याच्या तक्रारी प्रत्येक शाळेमध्ये आहेत. मुले लहान असल्याने त्यांना टॅब हाताळणे कठीण जाते. काही जण स्वत:च टॅब दुरुस्त करतात, तर काही शाळेत जमा करतात.

मुलांचे केवळ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब नसून चित्र किंवा दृक्-श्राव्याच्या माध्यमातून मुलांना आधुनिक पद्धतीने ज्ञान देणे हा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे शिवसेनेने निश्चित केले होते; परंतु यावर पुढे काही विचार झाला आहे का? याविषयी मात्र कोणाकडेच माहिती नाही.

दुरुस्तीकडे दुर्लक्ष

स.वा. जोशी शाळेमध्ये १८० विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी टॅब वाटप करण्यात आले. त्यापैकी १५५ टॅब खराब झाले आहेत. ते दुरुस्त करण्याविषयी संबंधित कंपनीला व लोकप्रतिनिधींनाही कळविले आहे. जून महिन्यात हे टॅब दुरुस्तीसाठी नेण्यात येणार असल्याचे सांगितले, परंतु जुलै महिना उजाडला तरी अद्याप हे दुरुस्त झालेले नाहीत. ऑगस्टपर्यंत टॅब दुरुस्त होतील आणि मुलांचा अभ्यासक्रम सुरळीत सुरूहोईल, असे शाळेचे मुख्याध्यापक ए.बी. दावणे यांनी सांगितले.