ठाणे, अंबरनाथ पालिकांकडून महाड, चिपळूण तालुक्यांमध्ये पथके रवाना

ठाणे : कोकणातील महाडमधील तळीये आणि चिपळूण या पूरग्रस्त भागांच्या मदतीसाठी ठाणे आणि अंबरनाथ पालिकेची पथके धावून गेली असून या पथकांकडून साफसफाई, औषध फवारणी करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्य़ातील शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, भाजप या पक्षांसह काही सामाजिक संस्थांकडून विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि धान्याची मदत पोहचवित आहेत.

महाड तळीये येथे दुर्घटना घडल्याच्या दिवसापासून ठाणे महापालिका त्या ठिकाणी मदतकार्य करीत आहे. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने चार दिवस मदतकार्य केले. पूरपरिस्थितीनंतर महाड आणि चिपळूणमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने दोन्ही ठिकाणी आरोग्य पथके पाठविली आहेत. या पथकाच्या माध्यमातून दोन्ही ठिकाणी तपासणी शिबिरे सुरू आहेत. त्यामध्ये आतापर्यंत शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. लेप्टोस्पायरोसिस आजार होऊ नये म्हणून नागरिकांना डॉक्सिसायक्लीन औषधे देण्यात येत आहेत. महाड भागासाठी उद्या वरिष्ठ निरीक्षक केदार पाटील आणि कनिष्ठ अभियंता सुनील सजनानी यांच्या आधिपत्याखाली अग्निशमन दलाचे एक वरिष्ठ अधिकारी, २९ फायरमन आणि तीन गाडय़ा, टीडीआरएफचे १३ जवान, फायलेरिया विभागाचे ३० कर्मचारी, मलनिस्सारण विभागाचे ४० कर्मचारी, ५५ सफाई कामगार असे पथक पाठविले होते.

चिपळूण भागासाठी उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या आधिपत्याखाली साफसफाई, आरोग्य तपासणीचे कार्य सुरू आहे. या शहराची २५ विभागांत विभागणी करून ठाणे पालिकेच्या १५ जणांचा चमू प्रत्येक विभागात पाठविण्यात आला आहे. यामध्ये  साफसफाई कर्मचारी व औषध फवारणी कर्मचाऱ्यांसह १ जेसीबी, १ डम्पर पाठविण्यात आला आहे.

महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ही पथके पाठविली असून अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे आणि उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके कामे करीत आहेत. हे सर्वच वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पाहाणी करीत आहेत. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातून जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप योग्य पद्धतीने करण्यात आले आहे. पालिकेचे विशेष पथक शुक्रवारी पुन्हा महाडला रवाना झाले असून त्यांच्यासोबत पालकमंत्री शिंदे आणि महापौर म्हस्के हे सुद्धा गेले आहेत. ते आज सकाळी ९ वाजता महाड नगर परिषद येथे अधिकाऱ्यांसोबत नियोजनाबाबत बैठक घेणार आहेत.

अंबरनाथकरांकडून कपडे, खाटा इत्यादींचे सहाय्य

कोकणातील महाड, चिपळूण या भागात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत तेथील नागरिकांना सावरण्यासाठी अंबरनाथकरांनीही मोठी मदत केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या ४० सफाई कामगारांनी महाड शहरात साफसफाई करण्यात सहभाग नोंदवला असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी दिली आहे. तीन दिवस सफाई कर्मचारी या ठिकाणी कार्यरत होते. तर अंबरनाथ शिवसेना शाखेच्या माध्यमातून फोल्डिंग खाटा, चादरी, महिला आणि पुरुषांचे कपडे, भांडय़ांचे संच, मेणबत्ती, विजेऱ्या, खाद्यपदार्थ, औषधे अशा विविध वस्तूंचे दोन ट्रक मदत गुरुवारी पाठवली. तर अंबरनाथ, बदलापूर शहरांतील रोटरी क्लबच्या विविध शाखांनीही कोकणात मदत पाठवली आहे. महाड-पोलादपूर रहिवासी संघ, स्थानिक रहिवाशांच्या गटानेही आपापल्या परीने महाड, चिपळूण येथे मदत पाठवली आहे.

डोंबिवली शिवसेनेची मदत

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेकडून शुक्रवारी ८० टन जीवनावश्यक वस्तूंचे १६ टेम्पो साहित्य कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले. महाड, पोलादपूर, चिपळूण परिसरांतील पूरग्रस्तांना ही मदत देण्यात येणार आहे. त्यात  किरणा साहित्य, तांदूळ, साखरेच्या गोणी, तेलाचे डबे, लहान मुलांसाठी खाऊ, पाण्याच्या बाटल्या, कपडे, सॅनिटरी नॅपकीनचा सामानामध्ये समावेश आहे.