भंगार चोरीचे बिंग फुटेल या भीतीपोटी चौघांनी एका तरुणाचा निर्घृणपणे खून केला. आपल्यावर संशय येणार नाही, याचीही त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली. पण तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या पोलिसांनी त्यांना अखेर बेडय़ा ठोकल्याच..

उत्तरशीव भागातील भंडार्ला परिसरात कारखाने आणि गोदामे आहेत. याच भागात गोदाम आणि कारखान्यात काम करणारे कामगार राहतात. १० एप्रिल २०१८ रोजी पहाटे सहा वाजता या भागात एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच शिळडायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करण्यास सुरुवात केली. लोखंडी अवजड वस्तूने तरुणाच्या डोक्यावर प्रहार करून हा खून करण्यात आल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली. मृत व्यक्तीचे नाव जमील ऊर्फ अंग्रेज नशीबदार असल्याचे समोर आले. २६ वर्षांचा जमील हा परिसरातील भंगाराच्या दुकानात काम करायचा. त्याचा मोठा भाऊ आदिल खान याचे परिसरात चहाचे दुकान असून या दुकानाबाहेरील खाटेवर झोपलेला असताना जमीलचा खून करण्यात आला होता. घटनास्थळावरून पोलिसांना काहीच धागेदोरे मिळत नव्हते. त्यामुळे या हत्येचा तपास पोलिसांसमोर एक आव्हान बनले होते.

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण, पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, सहायक पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. जमीलचा खून रात्री २ ते पहाटे ६ या कालवधीत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या कालावधीत घटनेच्या ठिकाणी कोणते मोबाइल क्रमांक सुरू होते, याची माहिती मिळविण्याचे काम पथकाने सुरू केले. त्यासाठी विविध मोबाइल कंपन्यांकडून माहिती मागविण्यात आली. या कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचा जगनारायण वर्मा, नंदराम वर्मा, प्रमोदकुमार वर्मा आणि बडकाऊ  पासवान यांच्यावर संशय बळावला. चौकशीअंती हे चौघेही उत्तर प्रदेशात असल्याचे आढळून आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, अशोक भंडारे, पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ, पोलीस नाईक विजय काटकर, नंदकुमार पाटील, राकेश सत्रे, बाळु भांगरे, दीपक जाधव, रतीलाल बसावे, तडवी, धायगुडे, पोलीस शिपाई प्रदीप कांबळे, अण्णा एडके आणि पवार यांचे पथक उत्तर प्रदेशात गेले. जगनारायण, नंदराम आणि प्रमोदकुमार या तिघांचा शोध घेऊन पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी खुनाची कबुली दिली आणि या खुनाचा सविस्तर उलगडा झाला.

उत्तरशीव परिसरामध्ये शफरुद्दीन याच्याकडे भंगार वेचण्याचे आणि भंगाराची गाडी भरण्याचे काम आरोपी करीत होते. गुन्हा घडला त्या दिवशी आरोपी भंगाराच्या गाडीचे काटय़ावर वजन करत होते. त्या वेळेस जगनारायण हा भंगाराच्या गाडीतून मोठय़ा वजनाच्या काही लोखंडी वस्तू बाहेर फेकत होता. हा प्रकार जमील याने पाहिला होता आणि या चोरीबाबत मालकाला माहिती देणार असल्याचे सांगितले होते. त्याने मालकाला भंगार चोरीची माहिती दिली तर आपल्या चोरीचे बिंग फुटेल, अशी भीती आरोपींना वाटू लागली आणि त्यातूनच त्यांनी रात्रीच्या वेळेस लोखंडी वस्तूने डोक्यात प्रहार करून जमीलची हत्या केली, अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून पुढे आली.