वर्तकनगर भागातील वेदांत रुग्णालयामध्ये प्राणवायूअभावी चार करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी सोमवारी केला. रुग्णालय प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळून लावत रुग्णालयामध्ये प्राणवायूचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला आहे. यामुळे त्या चौघांच्या मृत्यूचे गूढ वाढले असून ते उकलण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

वेदांत या खासगी करोना रुग्णालयात चार रुग्णांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे धक्का बसलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. प्राणवायूच्या अभावामुळेच चौघांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. हा आरोप चुकीचा असून रुग्णालयात पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा साठा उपलब्ध आहे. रुग्णालयात ८५ रुग्ण हे प्राणवायूवर आहेत. त्यातून चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्राणवायूअभावी मृत्यू झाला, हे म्हणणे अयोग्य आहे. त्या चारही रुग्णांची प्रकृती खालावल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे चौघांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली असून या समितीच्या चौकशी अहवालानंतरच आता मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.