गर्दुल्ल्यांच्या वावरामुळे कचरा

लोकसत्ता वार्ताहर

वसई: नालासोपारा येथे पालिकेतर्फे खुला रंगमंच बांधण्याचे काम सुरू केले होते, परंतु त्याला सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही  काम अजूनही अपूर्ण स्थितीत आहे. सध्या या रंगमंचाच्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य व दरुगधी पसरली असल्याने अर्धवट स्थितीत असलेल्या रंगमंचाची बकाल अवस्था झाली आहे.

नालासोपारा पूर्वेतील मजेठिया पार्क येथील परिसरात पालिकेने खुला रंगमंच उभारण्याचे काम सन २०१४ साली सुरू केले होते. त्यासाठी निधीही मंजूर केला होता.  त्यानुसार या भागात संरक्षक भिंत, उद्यानही करण्यात आले होते.

मात्र हा रंगमंच खुला न ठेवता तेथे छत टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. या मागणीनुसार छत टाकण्याचेही काम हाती घेतले. या रंगमंचाच्या कामासाठी पालिकेने आतापर्यंत तीन ठेकेदार नेमले, परंतु तरीसुद्धा हे काम पूर्णत्वास गेले नाही.

सध्याच्या स्थितीत या खुल्या रंगमंचाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणी फिरकत नसल्याने याचा गैरफायदा घेत गर्दुल्ले या ठिकाणी येऊन बसत आहेत. त्यामुळे  प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदांचे तुकडे, खाद्यपदार्थाची आवरणे, दारूच्या बाटल्या, सिगारेटची थोटके असा विविध प्रकारचा कचरा जमा होऊ लागला आहे. त्यामुळे येथील परिसरात घाणीचे साम्राज्य तयार होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

वसईसारख्या सांस्कृतिक शहरातील बांधकाम सुरू असलेल्या रंगमंचाची अशा प्रकारची अवस्था होऊ लागल्याने नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन रंगमंचाचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करावा,अशी मागणी नागरिक करीत आहेत.

रंगमंचाच्या ठिकाणी जे कोणी गर्दुल्ले येऊन बसत आहेत त्याबाबत पोलिसांना पत्र दिले होते तसेच रंगमंचाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, परंतु त्यामध्ये काही बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील दुरुस्तीच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे.
– मनाली शिंदे, सहायक आयुक्त, प्रभाग समिती ‘ड’