डॉ. तात्याराव लहाने यांचे प्रतिपादन; बाबा आमटेंच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम
आपल्या धार्मिक भावना आणि अंधश्रद्धा बाजूला सारत वैज्ञानिक पुनर्जन्म होऊ द्या, त्यासाठी मृत्युपश्चात अवयवदानाची चळवळ वाढवा, असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी बदलापूरकरांना केले. बाबा आमटेंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत सत्कर्म परिवाराने स्मृतिगंध या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी डॉ. लहाने बोलत होते.
बाबा आमटेंच्या आनंदवनातील कार्यामुळे कुष्ठरोग मोठय़ा प्रमाणावर बरा होत चालला आहे. मात्र कुष्ठरोगाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन मात्र तसाच आहे. तो दृष्टिकोन सर्वप्रथम बदलला पाहिजे, त्यातूनच कुष्ठरोगातून बाहेर आलेल्यांना बळ मिळेल, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. मुक्त संवाद साधत असताना त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या वेळी त्यांच्या स्वत:च्या किडनी प्रत्यारोपणाची कहाणी सांगत असताना ते भावुक झाले. माझ्या आईने दिलेल्या किडनीमुळे आज माझा पुनर्जन्म झाला असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या वेळी त्यांनी त्यांच्या डॉक्टर बनण्याचा प्रवासही रसिकांसमोर उलगडला.
अपघाताने डोळ्यांचा डॉक्टर झालो आणि अपघातानेच मुंबईत आलो. मात्र बाबा आमटेंच्या रूपाने मला समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच मी दीड लाख डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करू शकलो, असेही त्यांनी या वेळी सांगितले. भारतातील संशोधन हे पाश्चिमात्य संशोधनापेक्षा सरस आहे आणि आपल्या देशात विज्ञानापलीकडच्याही काही गोष्टी आहेत असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वत:च्या आहाराची काळजी घ्या, जीवनशैली बदला आणि व्यायामाला प्राधान्य द्या, असा संदेशही त्यांनी या वेळी दिला.
या वेळी सत्कर्म परिवारच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विजय आव्हाड या अंध गझलकाराच्या गझलेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी नेत्रदानाची नोंदणीही करण्यात येत होती. या वेळी जयश्री जांभळे आणि सत्कर्म परिवाराचे संजीव साळी उपस्थित होते.