सागर नरेकर

वालधुनी नदीवरील जुना आणि जीर्ण झालेला पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने उल्हासनगर आणि कल्याण शहराच्या प्रवेद्वारावर मोठी कोंडी होऊ लागली आहे. त्यावर उपाय म्हणून याठिकाणी नव्या पुलाची उभारणी केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीचा निर्णय घेतला असून या कामासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुलाची उभारणी दीड वर्षांत केली जाणार असून यामुळे कल्याण आणि उल्हासनगर शहरांचे प्रवेशद्वार मोकळा श्वास घेऊ शकतील, असा दावा केला जात आहे.

व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर आणि कल्याण शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ७६ येथे वालधुनी नदीवर असलेला पूल गेल्या काही वर्षांत जीर्ण झाला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक गेल्या वर्षी बंद करण्यात आली होती. त्यामुळे जुन्या पुलाशेजारी उभारलेल्या नव्या पुलावरून आता दुहेरी वाहतूक सुरू आहे. दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या पुलावरून दररोज लाखो वाहनांची ये-जा असते. उल्हासनगर शहर व्यापारी असल्याने अनेक अवजड वाहने या पुलावरून शहरात प्रवेश करत असतात. तसेच उल्हासनगर शहराच्या प्रवेशद्वारावरच अनेक गोदामे उभी राहिल्याने या भागात अवजड वाहनांची मोठी गर्दी होत असते. त्यातच दुहेरी वाहतुकीसाठी असलेला एक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ता पुलावर निमुळता झाला आहे. त्यामुळे अनेकदा येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. याठिकाणी होणाऱ्या कोंडीत अवजड तसेच लहान वाहनेही अडकून पडतात. त्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बंद असलेला जीर्ण पूल पाडून त्याठिकाणी नवा पूल उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. या मागणीला आता मंजुरी मिळाली आहे.

वालधुनी नदीवर जीर्ण झालेला पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या पुलाच्या उभारणीसाठी दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. या पुलामुळे दोन्ही शहरांची वाहतूक कोंडीमुक्त होण्याची आशा आहे. लवकरच या कामाची निविदा काढण्यात येणार असून येत्या वर्ष-दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

ग्रामीण भागांतील पुलांना मंजुरी

वालधुनी नदीवरच्या पुलासह अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील नद्यांवरील विविध पुलांनाही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजुरी मिळाली आहे. यात वांगणी, काराव, धसई, पळू, डोळखांब, मोरोशी या पुलांसाठी १६ कोटी १८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या पुलामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.