अंबरनाथ-बदलापूरमधील वीजपुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता; महावितरणच्या अधिकाऱ्यांची अनास्था  

अंबरनाथ आणि बदलापूर  शहरांतील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी  केंद्राच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत अंबरनाथ येथील उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. यामुळे बदलापूरला चांगल्या क्षमतेने वीजपुरवठा होणार आहे. मात्र कंत्राटदार कंपन्यांनी संथगतीने काम सुरू केल्याने वीज पुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विजेच्या वाढत्या मागणीमुळे पुरवठय़ात अनियमितता येत आहे. त्यामुळे अनेकदा  वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे येथील ताण कमी करण्यासाठी विजेच्या मागणीची विभागणी आवश्यक ठरली आहे. त्यासाठी पुढाकार घेत केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत अंबरनाथ बदलापूरमधील चिखलोली भागातील एम्पायर स्टेट या खासगी विकासकाच्या जागेत ३५० एम्पियरच्या उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी ५२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरीही दिली.

त्यानंतर याच्या निविदा निघून कार्यादेश देण्याची प्रक्रिया नोव्हेंबर २०१६ पर्यंत पूर्ण गरजेचे होते. मात्र याचे कार्यादेश मिळण्यासाठी २०१७ मधील जून महिना उजाडला. त्यानंतरही या कामात हवी तशी प्रगती दिसून आली नाही. ऊर्जा मंत्रालयाच्या नियोजनानुसार या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या ३३ किलोवॉटच्या चार फिडरचे काम ऑगस्ट २०१७ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. तसेच यातील सर्वात महत्त्वाचा भाग असणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे कामही ऑगस्ट महिन्यापर्यंतच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप या उपकेंद्राची पायाभरणीही झालेली नाही.

दरम्यान, या उपकेंद्रामधून चार नवे फिडर बाहेर पडणार असून त्यातील एक फिडर जिथे हे काम सुरू होईल, त्या ठिकाणी सुरू असलेल्या भव्य रहिवासी आणि व्यापारी संकुलासाठी असणार आहे. इतर तीन फिडर बदलापूर शहरासाठी असतील. सध्या बदलापूर शहरातील बहुतांश फिडरची मागणी वाढली असून ऐन मागणीच्या वेळी ताण वाढल्याने वीजपुरवठय़ावर त्याचा परिणाम होतो.

त्यामुळे या फिडरमुळे बदलापूर शहरतील वीज पुरवठय़ाला पर्यायी सुविधा तयार होणार असून त्याचा दोन लाख बदलापूरकरांना फायदा होणार आहे.मात्र या योजनेतील कंत्राटदाराच्या अनास्थेमुळे हे काम अद्याप प्राथमिक पातळीवरही झाले नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता कंत्राटदार कंपनीला हटविण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.