नव्या रस्त्यांवर गतिरोधकांअभावी वाहने वेगात

आशीष धनगर, ठाणे</strong>

वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेने दिवा शहरात नवे रस्ते उभारले असले तरी या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने रेल्वे स्थानक ते पोलीस चौकी मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहिलेले नाही. गर्दीच्या आणि रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक अथवा वेग नियंत्रण यंत्रणा उभारली जावी असा नियम आहे. दिव्यात मात्र नव्या रस्त्यांवर अशी व्यवस्था नसल्याने रेल्वे स्थानकाच्या दिशेने वेगाने वाहने हाकली जात आहेत. या रस्त्याच्या कडेला फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करत काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगपालिकेने मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण केले. नवीन रस्ते बांधण्यात आले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत. साधारण महिनाभरापूर्वी दिवा रेल्वे स्थानक ते श्री गणेश सोसायटीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. तेव्हापासून वाहनचालक वेगमर्यादा ओलांडून, वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहने चालवत असल्याने या रस्त्यावर अपघात वाढले आहेत. येथील पदपथांवर जागोजागी फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांच्या कडेने चालावे लागते. गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक वाहने भरधाव चालवतात. गेल्या आठवडय़ात रिक्षाच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे रहिवासी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने कोणतीही पावले उचललेली नाहीत. या रस्त्यावर लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांडून करण्यात येत आहे.

दिवा भागातील रेल्वे स्थानक ते गणेश सोसायटीपर्यंतच्या रस्त्याबाबत निर्माण झालेल्या समस्येची पूर्ण माहिती घेण्यात येईल. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या मार्गावर गतिरोधक बांधण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला जाईल.

– संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, मुंब्रा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे काही पोल रस्त्याच्या मध्ये येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. रस्ता बांधणीचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण केले जाईल.

– प्रशांत फाटक, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका