एमएमआरडीएकडून २९ कोटींच्या निविदा

आशीष धनगर, ठाणे</strong>

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बदलापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांना काँक्रीटचा साज चढविण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून शहरातील चार प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी २९ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले असून शहरातील चिंचोळे आणि दर वर्षी शरपंजरी पडणारे अंतर्गत रस्ते मजबूत करण्याकडे भर दिला जाणार आहे.

स्वस्त दरात प्रशस्त घरे आणि हवेशीर वातावरण यामुळे गेल्या काही वर्षांत बदलापूर तसेच आसपासच्या परिसरांतील नागरीकरण झपाटय़ाने वाढले आहे. हे शहर वाढत असले तरी येथील पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. शहरात भव्य गृहसंकुले उभी राहिली असली तरी बकाल वाहतूक व्यवस्था आणि अरुंद रस्ते यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. नगरपालिका प्रशासनाकडे पुरेसा निधी नसल्याने येथील रस्ते तसेच अंतर्गत वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या विकासकामांना मर्यादा येतात. त्यामुळे येथील रस्त्यांची बांधणी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत केली जावी, अशा स्वरूपाची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. बदलापूर तसेच आसपासच्या महामार्गाचे रुंदीकरण तसेच रस्त्यांची कामे महानगर विकास प्राधिकरणाने यापूर्वी सुरू केली असली तरी या कामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असताना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने बदलापुरातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधणीसाठी पुढाकार घेत २९ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.

शहरातील आगार आळी आणि शिवाजी चौक, बेलवली प्रभाकर पाटील कार्यालय ते बदलापूर गाव (फेज १) मार्गे मोहन ग्रीन वुड्स, आसाराम बापू आश्रम शिरगाव ते आर्यन व्हॅन हाऊसिंग सोसायटीमार्गे मॅरेथॉन नगरी अ‍ॅनेक्स आणि भगवती रुग्णालय ते बदलापूर गाव (फेज १) या अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. हे शहरातील अंतर्गत रस्ते असून या रस्त्यांलगत मोठय़ा बिल्डरांचे प्रकल्प उभे राहत आहेत. हे रस्ते चिंचोळे आणि खराब असल्याने या ठिकाणी अनेकदा अपघातही घडतात. त्यामुळे या रस्त्यांची बांधणी बिल्डरांच्या प्रकल्पांसाठीही फायदेशीर ठरणार असून निवडणुकीपूर्वी ही कामे सुरू होतील अशा पद्धतीची मोर्चेबांधणी केली जात आहे.

मुंबई महानगर विकास प्रधिकरणाच्या सहाय्याने बदलापूर शहरात अनेक पायभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. बदलापूर शहरातील या चार रस्त्यांची कामे झाल्यानंतर नागरीकांना त्याचा फायदा होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.

– दिलीप कवठकर, जनसंपर्क अधिकारी, एमएमआरडीए

रस्त्यांची नावे                                                                                     एकूण अंतर           अंदाजे खर्च

बेलवली प्रभाकर पाटील कार्यालय ते बदलापूर गाव (फेज १)                  १ किमी                   ९ कोटी २२ लाख  ८७ हजार रुपये

आसाराम बापू आश्रम शिरगाव ते आर्यन व्हॅन हाऊसिंग सोसायटी         १ किमी                  ७ कोटी ४९ लाख १६ हजार रुपये

भगवती रुग्णालय ते बदलापूर गाव (फेज १)                                          १ किमी                  ७ कोटी ३२ लाख ८५ हजार रुपये

आगार आळी आणि  शिवाजी चौक परिसर                                             १.३किमी                ५ कोटी ३४ लाख १४ हजार रुपये

एकूण अंतर आणि खर्च                                                                           ४.३ किमी              २९ कोटी ३९ लाख  २  हजार रुपये