tvlog02मुंबई उपनगरी रेल्वेची गर्दी हा सध्या चिंतेचा विषय आहे. गर्दीमुळे रेल्वे प्रवास अधिकाधिक जीवघेणा होऊ लागला आहे. ठाणे परिघातील शहरांची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढतेय, त्या तुलनेत उपनगरी गाडय़ा वाढत नाहीत. ठाणे शटल हा त्यावरील निश्चितच चांगला उपाय आहे. प्रवासी संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आता काही शटल गाडय़ा ठाण्याहून कर्जत-कसाऱ्यासाठी सुरूही झाल्या आहेत. मात्र त्यातील फारच थोडय़ा गर्दीच्या वेळेत आहेत. त्यातही संध्याकाळी डाऊन मार्गावर गर्दीच्या वेळेत बऱ्याच गाडय़ा आहेत. मात्र सकाळच्या वेळेत कसारा अथवा कर्जतहून ठाण्यासाठी एकही गाडी नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची गैरसोय होते. सकाळच्या वेळेत जलद गाडीतून डोंबिवली अथवा ठाण्यासाठी प्रवास करण्याची कल्पनाही ही मंडळी करू शकत नाहीत. त्यामुळे सकाळी किमान एक ठाणे गाडी असावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. पुढील महिन्यात रेल्वेचा अर्थसंकल्प आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे त्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांनी प्रवाशांच्या या मागणीचा पाठपुरावा करून सकाळच्या वेळी कर्जत/कसारा मार्गावर प्रत्येकी किमान एक ठाणे शटल सुरू करावी, असे आवाहन करावेसे वाटते.

बाईकस्वारांना आवर घाला
सतीश माने, डोंबिवली
डोंबिवली – सध्या तरुणाईचे आकर्षण झालेल्या स्पोर्ट्स बाईक सर्वसामान्यांची मात्र डोकेदुखी ठरत आहेत. डोंबिवलीतील निवासी भाग, गांधीनगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, रामचंद्रनगर परिसर आदी भागांत या बाईकस्वारांनी सध्या उच्छाद मांडला आहे. या बाईकस्वारांना आवर घालण्याची वेळ आता आली आहे. डोंबिवली शहरात सध्या बाईकस्वारांचा उच्छाद वाढला आहे. महाविद्यालयीन परिसर, निवासी विभाग, गांधीनगर परिसर हा जास्त रहदारीचा नसल्याने या विभागात हे बाईकस्वार स्टंटबाजी करताना दिसतात. रात्री अकरानंतर तर या गाडय़ांच्या आवाजाने नागरिकांची झोपमोड होतेच, शिवाय त्या आवाजाने लहान मुले, मुकी जनावरे घाबरतात. मध्यंतरी निवासी विभागात या बाईकस्वाराच्या धडकेने एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. तरीही पोलीस यंत्रणा काही जागी होत नाही. ज्या भागात या बाईकस्वारांचा धुमाकूळ असतो, त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारावी किंवा साध्या वेशात पोलीस उभे करावेत. पोलिसांचा धाक या मुलांना बसल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. पोलिसांनी नागरिकांच्या या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अन्यथा मुलांच्या या स्टंटबाजीच्या नादात कोणाचे प्राण जाण्याचीही शक्यता आहे.

कचराकुंडी हटली, वाहने उभी राहिली
मयूर चौधरी, डोंबिवली
शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्थानक परिसर स्वच्छ दिसावा यासाठी या परिसरातील कचरा कुंडय़ा हलविण्यात येत आहेत; परंतु कचराकुंडी हलवून परिसर स्वच्छ दिसू लागताच नागरिक त्याचे विद्रूपीकरण करीत असल्याचे दिसून येते. जागा मिळेल तेथे वाहनचालक आपली वाहने उभी करत असून आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखेच पादचाऱ्यांना वाटत आहे.
डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस स्टेशनसमोरील मच्छी मार्केटसमोर गेली कित्येक वर्षे कचराकुंडी होती. या कचराकुंडीच्या दरुगधीने येथील नागरिक हैराण झाले होते. शहर स्वच्छ सुंदर करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी योजना राबविण्यास सुरुवात केली. त्याच्या पहिल्या टप्प्यात येथील कचरा कुंडय़ा हलविण्यात आल्या आहेत. पश्चिमेतील मच्छी मार्केटसमोरील कचराकुंडी महिनाभरापूर्वी हटविण्यात आली आहे. येथील जागा रिकामी होताच नागरिकांनी येथे आपल्या दुचाकी गाडय़ा उभ्या करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गणेश मंदिराजवळ रिक्षा थांबा आहे. या रिक्षांची कोंडी, वाहनांची वर्दळ आणि एका बाजूने उभ्या असलेल्या दुचाकी यामुळे यातून मार्गक्रमण करणे खूप जिकिरीचे होत आहे.

बदलापुरातली धूळ आटोक्यात आणा
दिनेश म्हसकर, बदलापूर
बदलापूर – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक भागात धुळीचा त्रास जाणवत आहे. सध्या मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे धुळीचा त्रास होणे स्वाभाविकही आहे. मात्र, ज्या ठिकाणी काम झाले आहे, तेथे कामासाठी उत्खनन केल्यानंतर काढण्यात आलेली माती पडली आहे,
तर जेथे यापूर्वी कामे झाली आहेत तेथे खड्डे पडल्याने तेथून धूळ बाहेर पडत आहे. परिणामी धुळीच्या त्रासात अधिक भर पडली आहे. काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्यातून माती बाहेर पडून ती उडत आहे. शहरातील प्रत्येक रस्ता या धुळीने भरून गेला असून रस्त्यावरून चालणारे नागरिक, प्रवासी, घरात ही धूळ साठत आहे. यामुळे ब्राँकायटिससारखे श्वसनाचे विकास सध्या वाढताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले दिसत नाही. तसेच तक्रार करूनही लक्षात देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर उत्तर न देणे ही खेदाची बाब असून सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.

रस्त्यावर फेरीवाले आणि दुकानदारांचे आक्रमण
प्रदिप उत्तेकर, ठाणे</strong>
ठाण्यातील नितीन कंपनीपासुन ते इंदिरानगपर्यंतचा संपूर्ण रस्ता योग्य तऱ्हेने बनवला गेला असला तरी, त्याचा पूर्णपणे उपभोग मात्र फेरीवाले आणि दुकानदार घेत आहेत. येथील रस्त्यांवरुन एकावेळी दोन मोठी वाहने जाऊ शकतात. मात्र फेरीवाले आणि दुकानदारांच्या आक्रमणामुळे प्रत्यक्षात वाहतुकीसाठी रस्ता अरूंदच आहे. त्यात अवैध पार्किंगने रस्त्याचा फार मोठा भाग बळकावला आहे. त्यामुळे दोन वाहनांच्या जागी एकावेळी एकच वाहन जाऊ शकेल इतकीच जागा शिल्लक आहे. नागरिकांना चालण्यासाठी तयार केलेले पदपथ नागरिकांसाठी नसुन दुकानदारांसाठी तयार केले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे नागरीकांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नितीन कंपनीपासून रस्त्याचे पदपथ दुकानदारांनी काबीज केले आहेत. यावर प्रशासनाने कठोर कारवाई करुन नागरिकांसाठी पदपथ मोकळे करुन द्यावे, असे आवाहन करावेसे वाटते.