काही ‘विशिष्ट’ कामासाठी रात्र जागून काढायची म्हटले तर ते चहा, कॉफी, बनमस्का, जामपाव यासोबत आणि काहींना सिगारेटही लागतेच. ‘निशाचरांची’ हीच गरज ओळखून ठाणे आणि परिसरात अनेक ठिकाणे अशी आहेत, जिथे दिवसभर शुकशुकाट असला तरी रात्री मात्र लोकांची वर्दळ सुरू होते. पूर्वी ठाण्यात रात्री १२ नंतर चहा जरी प्यायचा म्हटले तरी लोकमान्यनगर, इंदिरानगर, वर्तकनगर आदी भागांतील तरुणांचे जत्थे टेंभीनाका, ठाणे स्थानकाकडे वाट वाकडी करून यायचे. कालांतराने वागळे इस्टेट परिसरात २४ तास सुरू असणारे आयटी पार्क उभे राहिले. या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना तिन्ही पाळ्यांमध्ये काम करावे लागते. तेव्हा झोपेवर ताबा ठेवून काम करायचे असते. ग्राहक राजाची हीच गरज ओळखून काही विक्रेत्यांनी वागळे इस्टेट येथील अंबिकानगरजवळच्या ‘आयशर आयटी पार्क’समोर चहा आणि तत्सम पदार्थाची दुकाने सुरू केली. त्यामुळे  तरुणांना हे ठिकाण सोयीचे ठरू लागले आहे.