ठाणे महानगरपालिका परिवहन कर्मचारी पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याच पॅनलला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. १५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या कर्मचारी पतसंस्थेमधील संचालकपदाच्या निवडणुकीत ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रगतिशील पॅनलचे तीन आणि पुरस्कृत अपक्ष असे एकूण चार उमेदवार निवडून आले. तसेच परिवर्तन पॅनलचे चार आणि स्वामी समर्थ पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले.
ठाण्यातील हरिनिवास येथील जय भगवान सभागृहात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्कीच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. पतसंस्थेचे एकूण १,७९५ मतदार असून १,५४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पतसंस्थेच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून बाळ परब यांनी काम पहिले. सर्वसाधारण गटातून सहा जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
त्यापैकी प्रगतिशील पॅनलचे उमेदवार भास्कर पवार, मनोहर जांगळे आणि सतीश लादे, अपक्ष उमेदवार किरण कदम, परिवर्तन पॅनलचे उमेदवार कैलास पवार, विलास पाटील, पांडुरंग सानप, दिलीप चिकणे आणि स्वामी समर्थ पॅनलचे उमेदवार प्रवीण विचारे, प्रतिभा गाडगे, विजया मुकादम आदी निवडूण आले. सर्वसाधारण गटातून प्रगतिशील पॅनलचे उमेदवार आणि विद्यमान सचिव मनोहर जांगळे यांना प्रथम क्रमांकाची ५३७ मते मिळाली. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून प्रगतिशील पॅनलचे सतीश लादे प्रथम क्रमाकांची मते मिळवीत विजय झाले.