News Flash

दणदणाटाविरोधात ज्येष्ठांची ‘कर्तव्य’तत्परता

ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरू झाला

ठाणे पोलिसांच्या ‘कर्तव्य’ हेल्पलाइनवरून ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी

ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरू झाला असतानाच या आवाजामुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता तक्रारीसाठी पोलिसांकडून हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे. एरवी पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून यासंबंधीच्या तक्रारी मांडल्या जात असत. मात्र, ठाणे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या कर्तव्य हेल्पलाइनवर  दणदणाटी उत्सवांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडू लागला आहे. या तक्रारींची लागलीच दखल घेतली जात असल्याचा दावा पोलिसांकडून केला असून आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून रस्ते अडवून उत्सव साजरे केले जात असल्याने रहिवाशी अक्षरश: हैराण झाले आहेत. उत्सवाच्या नावाखाली मंडळांकडून डीजेचा दणदणाट करून ध्वनिप्रदूषण करण्यात येते. हे चित्र गणेशोत्सवाच्या काळात ठिकठिकाणी पाहावयास मिळते. डीजेच्या आवाजामुळे लहान मुले, रुग्ण तसेच ज्येष्ठांसह सर्वच नागरिकांना त्रास होतो. अशा आवाजामुळे अनेकदा बहिरेपण येण्याची शक्यता असते. यंदाही ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सर्वच शहरांमध्ये मंडळांकडून ध्वनिप्रदूषण करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी अशा तक्रारींसाठी नागरिक फारसे पुढे येत नव्हते. यंदा मात्र ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात तक्रारी करण्यासाठी नागरिक पुढे आले आहेत. ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या १०९० या हेल्पलाइनवर गेल्या दोन दिवसांत ध्वनिप्रदूषणांसंबंधीच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर प्राप्त होऊ लागल्या आहेत. मंडळांकडून मोठय़ा आवाजात लाऊडस्पीकर सुरू असल्याने त्याचा खूप त्रास होत असल्याचे तक्रारी करताना ज्येष्ठांनी कळविले आहे. या तक्रारींची पोलिसांकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवून मंडळांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.

हेल्पलाईनच्या प्रतिसादामुळे कारवाईला यश

कल्याण येथील वसंत व्हॅली परिसरात गणेशोत्सवानिमित्ताने सोमवारी सकाळपासून मंडळांकडून लाऊडस्पीकरचा मोठय़ाने आवाज सुरू होता. या आवाजामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले होते. त्यापैकी एका नागरिकाने याच भागातील एका दक्ष नागरिकाला माहिती दिली. त्यानंतर या दक्ष नागरिकाने ज्येष्ठ नागरिकांच्या १०९० या हेल्पलाइनवर तक्रार केली असता, पुढच्या दहा मिनिटांत या भागातील लाऊडस्पीकरचा आवाज बंद झाला. त्यानंतर तक्रारीवर कारवाई झाली का, अशी विचारणा करणारा दूरध्वनी त्यांच्या मोबाइलवर पोलिसांच्या हेल्पलाइनवरून आला होता. या तक्रारीनंतर गेल्या दोन दिवसांपासून या भागातील आवाज आता काहीसा कमी झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 3:14 am

Web Title: noise pollution complaint rising during ganesh festival on senior citizens helpline
Next Stories
1 साखर-खोबऱ्याच्या प्रसादाला बर्फीचे नवे रुप
2 गौरीच्या सणात महालक्ष्मीचे पूजन
3 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनाने घडविले..
Just Now!
X