khauपि झ्झा, बर्गर या पदार्थाना एके काळी अरबट चरबट खाणं समजून नाकमुरडलं जायचं, पण आता या विदेशी पदार्थानी हळूहळू का होईना आपल्या खाद्यसंस्कृतीत कधीच शिरकाव केला आहे. हल्ली ‘लंच’ऐवजी ‘ब्रंच’ घेणाऱ्या पिढीला नेहमीच्या पदार्थापेक्षा हे फास्ट फूडच पूर्णब्रह्म वाटतं. त्यामुळे चायनीजप्रमाणे या पदार्थाची दुकानेही वाढत चालली आहेत. लोकांची ही बदलती चव ओळखून सुरू झालेल्या डोंबिवलीतील अशा नव्या सेंटर्सपैकी एक म्हणजे ऑन द स्पॉट हे कॅफे. नावाप्रमाणेच येथे अगदी झटपट ताजे पदार्थ बनवून दिले जातात. विनायक पालेकर या मराठी माणसाने सुरू केलेल्या या कॅफेचे वैशिष्टय़ म्हणजे तिथे किफायतशीर दरात विविध प्रकारच्या शाकाहारी व मांसाहारी पिझ्झाची चव चाखायला मिळते.
डोंबिवलीतील टिळक रोड येथे जानेवारी महिन्यात विनायक पालेकर यांनी ‘ऑन द स्पॉट’ हे कॅफे सुरूकेले. येथे तुम्हाला शाकाहारी तसेच मांसाहारी पिझ्झा, शाकाहारी व मांसाहारी सॅण्डविच, बर्गर, गार्लिक ब्रेड, पास्ता आदी पदार्थाची चव चाखता येईल. तुम्ही मागणी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला ताजेतवाने गरमागरम पिझ्झा, बर्गर, पास्ता समोर हजर होईल. विनायक यांनी संगणक विषयातले शिक्षण घेतले आहे. मात्र उद्योग व्यवसायाची आवड असल्यामुळे ते या क्षेत्रात आले. डोंबिवलीकर हे पक्के खवय्ये असल्याने त्यांना काही तरी वेगळे द्यावयाचे होते, पिझ्झा साधारण पिझ्झा हट किंवा डॉमिनोजमध्ये मिळतो. तो सहजासहजी कुठेही उपलब्ध व्हावा यासाठी डोंबिवलीत हे कॉर्नर सुरूकेल्याचे ते सांगतात.
येथे तुम्हाला २० ते २५ प्रकारच्या पिझ्झांची चव चाखता येते. शाकाहारी पिझ्झामध्ये मार्गारिटा पिझ्झा, मिक्स भाज्यांचा पिझ्झा, व्हॅलेंटिनो पिझ्झा, क्रन्ची मुंची पिझ्झा मिळतो. अशा प्रकारचे पिझ्झा इतरही मिळतात. मात्र येथे त्यावर थोडे वेगळे संस्कार केलेले असतात. उदा. पिझ्झावर अमेरिकन मका, कांदा, टोमॅटो, ब्लॅक ऑलिव्ह, लसूण, मशरुम अशा दहाएक पदार्थाचे टॉपिंग्ज केलेले असते. त्यामुळे हा पिझ्झा पैसा वसूल करणारा असतो. मार्गारिटा पिझ्झामध्ये टोमॅटोचा वापर जास्त असतो. पनीरचा वापर करून केलेला पिझ्झा हे ‘ऑन द स्पॉट’चे आणखी एक वैशिष्टय़. त्याचप्रमाणे पनीर तंदुरी, पनीर टिक्का असे पनीरचे नावीन्यपूर्ण प्रकारही येथे मिळतात. ‘पनीर टिक्का’मध्ये लाल मिरची पावडरचा वापर केल्यामुळे त्याला छान तिखट चव असते. पनीर तंदुरीमध्ये पनीर हे खरपूस भाजले जाते. यासोबतच तुमचा जर चटपटीत खाण्याचा मूड असेल तर चाट पनीर हाही एक वेगळा पर्याय तुम्हाला येथे उपलब्ध आहे. बेबी मकाचा वापर करून बनविलेले व्हेज सुप्रीम, एक्सोटिका, व्हेज शेजवान हेही पर्याय पिझ्झामध्ये उपलब्ध आहेत.
शाकाहारी पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर मांसाहारी पिझ्झा येथे उपलब्ध आहेत. चिकन तंदुरी पिझ्झामध्ये चिकनचे पिस हे मोघलाई पद्धतीने बनविले जातात. तसेच चिकन रोस्ट, बटर चिकन, हॉट चिकन, चिकन डिलाईट, चिकन चिली, चिकन बोनाझा, चिकन मॅक्सिकन, चिकन नेपोलियन आदी प्रकार येथे मिळतात. चिकन पिझ्झामध्ये ताज्या चिकनचा वापर केला जातो. नेपोलियन चिकन पिझ्झामध्ये सलामी चिकन (चिकनचा एक प्रकार), शेजवान, बेबी कॉर्न, चिकन आदीचा वापर केला जातो. ‘ऑन द स्पॉट’ स्पेशल पिझ्झाही येथे तुम्हाला मिळेल, यात रोस्टेड चिकन, कांदा, स्पायसी कबाब, गार्लिक, कॅप्सिकम, ब्लॅक पेपरचा वापर करून बनविण्यात आला आहे.
येथे मिळणाऱ्या पिझ्झाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पिझ्झासाठी रेडीमेड पिझ्झा ब्रेड वापरला जात नाही, तर पिझ्झाचा बेस खरपूस भाजलेल्या भाकरीसारखा असतो. विशेष म्हणजे, हा बेस ते स्वत: तयार करतात आणि तेही पिझ्झाची ऑर्डर आल्यावर. हा स्टोन पिझ्झा असल्याने तो एकदम फ्रेश आणि कुरकुरीत लागतो. दुसरं म्हणजे पिझ्झासाठी लागणारं सॉस ते येथेच बनवितात. १२, १४ आणि १६ इंची असे वेगवेगळ्या आकारांतील पिझ्झा ८० ते ५०० रुपयांपर्यंत येथे मिळतात. याबरोबरच व्हाइट सॉस पास्ता ग्राहक जास्त पसंत करतात. सॅण्डविचमध्येही तुम्हाला शाकाहारी व मांसाहारी सॅण्डविच मिळते. आमलेट, चिकन पिस, चीज व भाज्यांचा वापर करून हे सॅण्डविच बनविले जाते. ग्रिल केल्यावर या सॅण्डविचची चव लज्जतदार होते, ग्राहकही ते चवीने खातात, असे विनायक सांगतात. गार्लिक ब्रेड, बर्गरही येथे मिळतात.

ऑन द स्पॉट कॅफे
कुठे- ३ ए, सुधाकुंज, ब्राह्मण सभागृहाच्या समोर, डोंबिवली (पू.)
वेळ- सकाळी ११ ते रात्री १०.३०