ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पालिका परिवहन प्रशासनाने खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी या बसगाडय़ांच्या वाहतुकीतून परिवहन प्रशासनाला दीड महिन्यात १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांचा या बसगाडय़ांना उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ-सायंकाळच्या वेळी या बसगाडय़ांना महिलांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. महिलांचा असा प्रतिसाद दुपारच्या वेळेसही या बसगाडय़ांना मिळाला तर, या बसगाडय़ा पूर्ण वेळ महिलांसाठी चालविण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महिलांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने ठाणे महापालिका क्षेत्रात टीएमटी प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी शहरातील विविध मार्गावर दहा तेजस्विनी बसगाडय़ा सुरू केल्या आहेत. या बसगाडय़ा सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत केवळ महिलांसाठी तर दुपारच्या वेळेत सर्वासाठी चालविण्यात येतात. या बसगाडय़ाच्या वाहतुकीतून टीएमटी उपक्रमाला २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत २ लाख ५३ हजार ७५ रुपयांचे तर, १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत १३ लाख १७ हजार ३५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठाणे शहराच्या लोकसंख्येच्या मानाने टीएमटीच्या ताफ्यातील बस गाडय़ांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे बसगाडय़ांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासन गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. असे असतानाच, शहरातील महिलांसाठी ५० तेजस्विनी बसगाडय़ांच्या खरेदीसाठी राज्य शासनाकडून महापालिकेला निधी प्राप्त झाला असून या बसगाडय़ा टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्यानुसार टीएमटीच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी दहा तेजस्विनी बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. ठाणे स्थानक पश्चिम ते वृंदावन सोसायटी, ठाणे स्थानक पश्चिम ते लोकमान्यनगर, ठाणे स्थानक पश्चिम ते वागळे आगार, ठाणे स्थानक पश्चिम ते गावंडबाग, ठाणे स्थानक पश्चिम ते पवारनगर, ठाणे स्थानक पश्चिम ते खारेगाव, ठाणे स्थानक पश्चिम ते कासारवडवली, ठाणे स्थानक पश्चिम ते धर्माचापाडा, ठाणे स्थानक पश्चिम ते दादलानीपार्क आणि ठाणे स्थानक पश्चिम ते कोलशेत अशा दहा मार्गाचा समावेश आहे.

सकाळ-सायंकाळच्या वेळी या बसगाडय़ांना महिलांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. महिलांचा असा प्रतिसाद दुपारच्या वेळेसही या बसगाडय़ांना मिळाला तर, या बसगाडय़ा पूर्ण वेळ महिलांसाठी चालविण्यात येतील, असे टीएमटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.