तळपत चाललेला उन्हाळा आणि राज्यभर झालेला अवकाळी पाऊस यांमुळे भाज्यांचे दर एकीकडे वाढत असताना रोजच्या जेवणातील हमखास घटक असलेल्या कांदा आणि बटाटय़ाच्या दरांनी मात्र उतरण सुरू केली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बटाटय़ाची आवक वाढल्याने बटाटय़ाचे दर किलोमागे चार रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. तर कांदाही १४ रुपये किलोने घाऊक बाजारात उपलब्ध होत आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा विभागात मागील महिन्यामध्ये बटाटा २७ ते २८ रुपये किलोने विकला जात होता. मात्र गुजरात, पंजाब, इंदोर आणि दिल्लीमधून दिवसाला सुमारे ५० ते ६० टन बटाटय़ाची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात बटाटय़ाचे दर ४ ते ५ रुपयांपर्यंत कोसळले आहेत. त्याचबरोबर कल्याणच्या किरकोळ बाजारात बटाटा १० रुपये किमतीला मिळू लागला आहे. ठाण्यात किरकोळ बटाटा १८ तर कांदा २८ रुपये किलो विकला जात आहे. तर डोंबिवलीमध्ये बटाटा २० आणि कांदा २५ रुपये किमतीने विकला जात आहे. प्रचंड मोठी आवक होत असल्याने कांदा बटाटय़ाचे दर घसरले असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली.
दुसरीकडे कांद्याने आपली सरासरी कायम राखली आहे. वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १४ रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. कल्याणमध्ये नाशिक, जुन्नर जिल्हय़ातील ओतूर येथून कांदा आणला जात असून त्याची आवक दिवसाला ४० ते ५० टनापर्यंत पोहचली आहे.  

बटाटावडा मात्र महागच!
बटाटय़ाच्या किमती घसरल्या असल्या तरी ऐन वेळी पोटची भूक शमवणारा बटाटावडा मात्र स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. बटाटा आज स्वस्त असला तरी त्याच्या किमतीमध्ये सतत कमी-जास्त होत असल्याने आज कमी दर असल्याने बटाटावडय़ाचे दर कमी केले तरी उद्या लगेच वाढवण्यापेक्षा वाट पाहून निर्णय घेणार असल्याचे वडापाव विक्रेत्यांचे म्हणणे आहे.