ठाणे पालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुखपट्टी, अंतर सोवळ्याच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश पुन्हा एकदा दिले असून या आदेशानंतरही अनेक आस्थापनांमध्ये अशा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमी वर ठाणे शहरामध्ये करोना नियमाचे पालन करत नसलेल्या आस्थपनांना तात्काळ टाळे ठोकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमी वर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. प्रभाग समिती स्तरावर सुरू असलेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी त्यांनी सोमवार सकाळपासून दौरा सुरू केला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी त्यांनी कळवा परिसराचा दौरा करून त्यामध्ये नगरसेवकांशी संवाद साधला. तसेच खारेगाव नाका परिसर, वास्तु आनंद गृहसंकुल, ओझोन व्हॅली गृहसंकुल या ठिकाणी त्यांनी भेटी देऊन तेथील नागरिकांशीही संवाद साधला.

सर्व सार्वजनिक शौचालयांची दररोज पाच ते सहा वेळा नियमितपणे साफसफाई करावी, सार्वजनिक तसेच गर्दीची ठिकाणे निर्जंतुकीकरण करावीत, मंगल कार्यालये आणि क्लब या ठिकाणी दररोज भेटी देऊन तेथील कार्यक्रमांचा आढावा घ्यावा. त्याचबरोबर त्यांच्याकडून कार्यक्रमांची आगाऊ माहिती घ्यावी, अशा सूचना त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

दोन दिवसांत दीड लाखांचा दंड वसू

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे.  गेल्या दोन दिवसांत मुखपट्टीविना फिरणाऱ्या ३०५ नागरिकांकडून एक लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात मुंब्रा परिसरातून १३ हजार, कळवा परिसरातून १६ हजार ५००, उथळसर  येथून १२ हजार, माजीवडा येथून १८ हजार ५००, वर्तकनगरमधून ११ हजार ५००, लोकमान्य सावरकर परिसरातून १४ हजार, नौपाडा-कोपरीतून ४३ हजार ५००, वागळे इस्टेटमधून १२ हजार, तर दिव्यातून ११ हजार ५०० असा दंड वसूल झाला.

अधिकाऱ्यांची कानउघाडणी

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी कळवा पारसिक भागातील ओझोन व्हॅली गृहसंकुलांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये इमारतीत करोना रुग्ण आढळल्यानंतरही येथे महापालिकेची यंत्रणा फिरकली नसल्याची बाब आयुक्त शर्मा यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी सर्वांसमोरच साहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना फैलावर घेऊन त्यांची कानउघाडणी केली.