पाच हजार मंडळांपैकी १७४ मंडळांनाच मंडपासाठी परवानगी

कीर्ती केसरकर, विरार

वसई-विरार शहरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मंडळांकडून रस्त्यावर बेकायदा मंडप उभारण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील पाच हजार मंडळांपैकी केवळ १७४ मंडळांना मंडप उभारण्यास, तर केवळ चार मंडपांना अग्निसुरक्षा परवानगी मिळालेली आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून अग्निसुरक्षा उपायांअभावी भाविकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना सार्वजनिक मंडळांना पालिकेकडून मंडप उभारण्याची परवानगी घ्यावी लागते. मंडप उभारताना रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही, हे पाहिले जाते तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासून पालिकेकडून मंडप उभारण्याची परवानगी दिली जाते. जर एखादा मंडप रस्त्याच्या मध्ये असेल अथवा त्यामुळे वाहतूक कोंडी होत असेल तर त्या मंडपाला अनधिकृत ठरवले जाते व त्याला परवानगी मिळत नाही. याशिवाय दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन विभागाकडून तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. मंडपात अग्निरोधक यंत्रणा आहे का, विजेच्या यंत्रणा सदोष आहेत का, आग लागल्यास सुरक्षेचे मार्ग आहेत का, हे सर्व तपासले जाते. अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला प्रत्येक मंडपास अनिवार्य असतो.

मात्र वसई-विरार शहरांतील गणेशोत्सव मंडळंनी पालिकेची परवानगी न घेताच रस्त्याच्या मधोमध अनधिकृतपणे मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे. वसई-विरार शहरांत ५ हजारांहून हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत; परंतु यांपैकी केवळ १७४ मंडळांना पालिकेतर्फे परवानगी देण्यात आलेली आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मंडळांनी अग्निसुरक्षेचा ना हरकत दाखला घेतलेला नाही. गणेशोत्सव मंडळांचा हा बेजबाबदारपणा केवळ नागरिकांना त्रासदायक ठरणार नसून भाविकांच्या जिवालाही धोका निर्माण करणारा आहे.

रस्त्यावर मंडप असणाऱ्यांवर कारवाई नाही

वसई-विरार शहरांत बरेच मंडप हे रस्त्याच्या मधोमध आहेत, तर बऱ्याच गल्ल्यांमध्ये किंवा रहदारीच्या रस्त्यांवर मंडप असल्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिकांना दरवर्षी वाहतूक कोंडी, गर्दी, इत्यादीचा त्रास सहन करावा लागतो. तर या मंडपांवर कारवाई होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांवर मंडप उभारण्याचे सत्र सुरू आहे. मंडपांना परवानगी देण्यासाठी पालिका प्रशासनाची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारावर मंडळांना मंडप बांधण्यास परवानगी दिली जाते. मात्र वसई-विरारमध्ये अशी अनेक मंडळे आहेत जी या नियमांचे पालन न करता मंडप बांधतात, तरीही पालिका प्रशासन यांच्यावर कारवाई करीत नाही व त्यांना बिनधास्तपणे परवानगी देते.

पालिका प्रशासनाची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यावरूनच परवानगी द्यायची की नाही हे ठरवले जाते. पालिकेला जी मंडळे योग्य वाटतील त्यांनाच परवानगी दिली जाईल. जर एखाद्या मंडपामुळे नागरिकांना त्रास होत असेल तर कारवाई केली जाईल.

-किशोर गवस, उपायुक्त, पालिका

प्रभागनिहाय परवानगी दिलेली मंडळे

अ — बोळींज २९

ब — विरार पूर्व ९

क -चंदनसार ५५

ड – नालासोपारा पूर्व ८

ई – नालासोपारा पश्चिम २२

एफ – धानीव/ पेल्हार ९

जी – वालीव ०

एच – नवघर ४१

आय – वसई गाव १