News Flash

बिगर करोना खासगी रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा

रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती 

संग्रहीत

रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती 

ठाणे : जिल्ह्य़ातील महापालिका तसेच खासगी करोना रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्राणवायूचा तुटवडा निर्माण होऊ लागला असतानाच, त्यापाठोपाठ आता जिल्ह्य़ातील बिगर करोना खासगी रुग्णालयांमध्येही प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत असून यातूनच काही रुग्णालयांनी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याबाबत सांगितल्याने नातेवाईकांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यामध्ये प्राणवायूचा पुरवठा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी ५ ते ६ हजार करोना रुग्ण आढळून येत असून त्यामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरातील सर्वाधिक रुग्ण असतात. रुग्ण संख्या वाढल्यामुळे जिल्ह्य़ातील पालिका तसेच खासगी करोना रुग्णालये भरू लागली आहेत. या रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढल्यामुळे प्राणवायूच्या पुरवठय़ाची मागणी वाढली असून यामुळे या रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यापाठोपाठ आता बिगर करोना रुग्णालयांमध्येही प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला असून गेल्या आठ दिवसांपासून ही रुग्णालये प्राणवायूच्या तुटवडय़ाचा सामना करीत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील बिगर खासगी करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला असून या पाश्र्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी बाहेरच्या शहरांमधून प्राणवायूचा पुरवठा करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी जेएसडब्ल्यू प्लॅंटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना वितरकांना प्राणवायूचा पुरवठा करण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

करोना रुग्णांना इतरत्र हलविले

भिवंडी येथील धामणकरनाका परिसरातील ऑरेंज रुग्णालयामध्ये १६ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी १२ रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या रुग्णालयामध्ये एक दिवस पुरेल इतकाच प्राणवायूचा साठा शिल्लक आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे प्राणवायू साठय़ाबाबत विचारणा केली असता, त्यांनी साठा शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्राणवायू अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने सर्व रुग्णांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला असून याबाबत त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी सांयकाळपर्यंत या रुग्णालयातील सहा रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 2:04 am

Web Title: oxygen shortages in non corona private hospitals zws 70
Next Stories
1 ऑक्सिजनअभावी घुसमट!
2 पाडव्याच्या उत्साहामुळे बाजारात गर्दी
3 चाचणीसाठी कामगारांच्या रांगा
Just Now!
X