तेजस पुरस्कार प्रदान; चित्रांमधील विविध कंगोरे स्पष्ट
रसिकांची वाहवा मिळेल, ते अधिक देखणे, शोभिवंत दिसेल म्हणून आपण कधीच चित्र काढले नाही. चित्रातून समाजमनावर एक चांगला संस्कार कसा होईल, त्या चित्राचा विचार करून तो रसिक कसा विचारप्रवृत्त होईल, अशा प्रकारच्या चित्रांना आपण सर्वाधिक प्राधान्य दिले. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी, मनातील घालमेल वाढविणारी चित्र आपण काढत नाही, असे मत ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी रविवारी येथे व्यक्त केले. हे सांगत असतानाच कामत यांनी रामायणातील स्वत: काढलेल्या चित्र मालिकेची शृंखला रसिकांसमोर उलगडली. या वेळी चित्रातील विविध प्रकारचे कंगोरे तसेच भाव कामत यांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कामत यांना ‘तेजस पुरस्कार’ देण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. टिळकनगर शाळेच्या पटांगणात आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिल्पकार भाऊ तथा सदाशिव साठे, संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद पटवारी, मधुकर शेंबेकर, सौ. कामत, संस्था सदस्य आशीर्वाद बोंद्रे, महेश ठाकूर, माजी मुख्याध्यापिका सविता टांकसाळे उपस्थित होते.
साहित्यिक, विचारवंत, ग्रंथकार, लेखक आपल्या साहित्यकृतीमधून समाजाशी जोडले जातात. तसा चित्रकार हा त्याच्या चित्रातून थेट समाजाशी जोडला जात नाही. तोच चित्रकार प्रात्यक्षिकामधून रसिकांशी संवाद साधत असेल तर ते चित्र साहित्यकृतीसारखे समाजासमोर बोलायला लागते. रसिक त्या चित्राचा ग्रंथाप्रमाणे आस्वाद घेतात आणि अशाच प्रकारच्या चित्रांना, चित्रमालिकांना आपण सर्वाधिक प्राधान्य देतो. हे सांगत असतानाच, कामत यांनी रामायणातील घटनांवर काढलेली चित्रे दृश्यफितीमधून दाखविली.
राम वनवासाला निघाल्यापासून ते वनवासावरून परतल्यानंतर झालेल्या भरतभेटीपर्यंत, तब्बल एक तासाची चित्रमालिका म्हणजे एक महाकाव्यच कामत यांनी पडद्यावर उलगडले.
कामत यांचा गौरव
चित्रमय महाकाव्यात आपण डुंबून गेलेले असताना त्यात पुन्हा भाषणबाजी करून त्याचा बेरंग करण्याचा प्रयत्न आपण करणार नाही. कामत यांच्या चित्रातील समयसूचकता, मनाचा ठाव घेणारे भाव संस्काराचे एक नवीन परिमाण उभे करतात. चित्र काढले आणि पाहिले, एवढय़ापुरतेच कामत थांबत नाहीत, एक संस्कारमालिका ठेवतात, अशा शब्दांत भाऊ साठे यांनी कामत यांचा गौरव केला. तर, ज्येष्ठ चित्रकारांच्या सल्ल्याने राज्यात, देशात चांगली शिल्पचित्रे उभी करता येतील. पर्यटनस्थळ म्हणून त्याचा उपयोग होईल. राज्याच्या अनेक भागांत- दर्शनी भागांत अनेक उंच पहाड आहेत. त्या ठिकाणी चांगली शिल्पचित्रे उभारता येतील. शासनाने त्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे, असे पटवारी म्हणाले.