विरार येथील खासगी जागेत लवकरच पासिंग ट्रॅक

वसईतील मालवाहू आणि प्रवासी वाहनांना वहन योग्यता चाचणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या पासिंग ट्रॅकच्या जागेची अडचण दूर झाली आहे. विरार येथे एका कंपनीने आपल्या खासगी जागेत या पासिंग ट्रॅकसाठी जागा दिली आहे. उच्च न्यायालयाच्या परवागनीनंतर हा ट्रॅक सुरू होणार आहे.

रिक्षा, टॅक्सी, बस तसेच टेम्पो आणि ट्रक यांसारख्या प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी वाहनांची योग्यता चाचणी (पासिंग) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करवून घ्यावी लागते, परंतु उच्च न्यायालाने वाहनांची ब्रेक तपासणी आणि योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रकवर घेणे आवश्यक आहे, असा आदेश १ नोव्हेंबर २०१७ पासून दिला होता. वसई-विरारमधील वाहनांना तपासणीसाठी कल्याण येथील उपप्रादेशिक कार्यालयात जावे लागायचे. कल्याण येथे आधीच असलेली वाहनांची गर्दी आणि त्यांना वेळ लागत असल्याने त्यांनी वसई-विरारच्या वाहनांच्या तपासणीसाठी विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून वसईच्या वाहनांची तपासणीच होत नाही. त्यामुळे तंदुरुस्त नसलेली आजारी वाहने रस्त्यावर आहेत आणि अनेक वाहने वहन योग्यता प्रमाणपत्र नसल्याने बंद आहेत. त्याचा मोठा फटका बसत होता. याबाबत मालवाहतूकदारांनी वसईच्या आमदारांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती.

आमदारांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयालगत असलेल्या एचडीआयएल या कंपनीला आपली जागा देण्याची विनंती केली होती. त्यानुसार कंपनीने आपल्या जागेत पासिंग ट्रॅक सुरू करण्यास परवानगी देत, तसे पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकर विरार येथील खाजगी जागेत पासिंग ट्रॅक सुरू होईल आणि वसईतील हजारो वाहनचालकांची समस्या दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य अमित वैद्य यांनी व्यक्त केला आहे.