ठाणे शहरातील उघडय़ा वीजपेटय़ांमुळे पादचाऱ्यांना धोका

ठाणे : जुन्या ठाणे शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणांचा रतीब एकीकडे मांडला जात असताना रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूकडील वेगवेगळ्या रस्त्यांवरून मार्ग काढणे प्रवाशांसाठी दररोज धोक्याचे ठरू लागले आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी विद्युत पेटय़ा (डीपी) आणि विजेच्या खांबाच्या तारा उघडय़ा असून याकडे ठाणे महापालिका आणि महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. अत्यंत दाटीवाटीचा आणि गजबजलेल्या अशा या परिसरातून चालणेही गर्दीच्या वेळेत अवघड होत असताना हे धोक्याचे सापळे चुकविताना नागरिकांना अक्षरश कसरत करावी लागत आहे.

जुन्या ठाणे शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड या भागात व्यावसायिक आस्थापनांचे मोठे जाळे पसरले आहे. तसेच या ठिकाणी सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे संपूर्ण शहरातून येथे येणाऱ्या रहिवाशांचा आकडा मोठा आहे. या भागातील वाहनतळांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्याची घोषणा केली आहे. तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे पदपथ असावेत अशा पद्धतीने आदेशही दिले जात आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र पदपथांवर बसविण्यात आलेले विद्युत डबे आणि विजेच्या खांबावरील लोंबकळणाऱ्या तारांमुळे या भागात नवी समस्या निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस उघडय़ा डीपींमधून मोठय़ा वाहिन्यांचा गुंता रस्त्याकडेला पडलेला दिसून येतो आहे. अनेक

ठिकाणी डीपीच्या पत्र्याचीही अवस्था खराब आहे. स्थानक परिसरात अनेक फेरीवाले त्यांच्या वस्तू विक्रीसाठी अशा डीपीच्या बाजूला पथारी मांडत असतात. या फेरीवाल्यांकडे वस्तू विकत घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.

मुंब्रा येथे महावितरणच्या उघडय़ा डीपी बॉक्सशी संपर्क आल्याने नुकताच पाच वर्षीय मुलगा भाजला होता. काही महिन्यांपूर्वी खोपट येथील एका टीएमटीच्या बस थांब्यावर एका तरुणाचा उघडय़ा तारांशी संपर्क येऊन दुर्दैवी अंत झाला होता. या पार्श्वभूमीवर नौपाडा तसेच आसपासच्या परिसरातील महावितरणचा हा सावळागोंधळ नागरिकांच्या मनात धडकी भरवू लागला आहे.

डीपी दुरुस्तीची कामे महावितरणकडून सुरू असतात. तसेच अशाप्रकारे उघडय़ा डीपी असतील तर नागरिकांनी संपर्क साधल्यास त्या डीपी तात्काळ दुरुस्त करण्यात येतील.

– ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.