News Flash

नोकरदार वर्गाला प्रवासाची झळ

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल महिन्यात टाळेबंदी लागू केली होती. अत्यावश्यक कर्मचारी वगळता इतरांना रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांमध्ये प्रवास करण्यास मुभा नाही.

लोकल वाहतूक बंद आणि त्यात इंधन दरवाढ; दररोजचा खर्च परवडेना

किशोर कोकणे/ नीलेश पानमंद

ठाणे : करोना टाळेबंदी शिथिलीकरणानंतर रेल्वेच्या लोकलगाडय़ांमधून वाहतूक करण्यास परवानगी मिळाली नसल्यामुळे नोकरदार वर्गाला घर ते कार्यालयापर्यंतच्या प्रवासासाठी रस्ते वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. तसेच वाहतुकीसाठी परिवहनच्या पुरेशा बसगाडय़ा उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्वत:च्या वाहनानेच नोकरदार वर्गाला प्रवास करावा लागत आहे. त्यातच इंधन दरात वाढ झाल्याने नोकरदार वर्गाचा प्रवास खर्च आणखी महागला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल महिन्यात टाळेबंदी लागू केली होती. अत्यावश्यक कर्मचारी वगळता इतरांना रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांमध्ये प्रवास करण्यास मुभा नाही. त्यामुळे खासगी कार्यालयातील अनेक कर्मचारी स्वत:च्या वाहनाने कार्यालयापर्यंत प्रवास करत आहेत. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर सर्वच खासगी कार्यालये सुरू झाली आहेत, तरीही सर्वसामान्यांसाठी लोकल वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्वच कर्मचाऱ्यांना रस्ते मार्गे वाहतूक करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी पुरेशी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकजण स्वत:च्या वाहनाने मुंबई, नवी मुंबई शहरातील कार्यालयापर्यंत दररोज प्रवास करीत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अनेकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून त्यांचे प्रमाणपत्र पाहून त्यांना रेल्वे प्रवासाकरिता तिकीट द्यायला हवे. रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याणपल्ल्याडच्या नागरिकांचे हाल होत आहेत. वाहतुकीची पुरेशी सुविधा नसल्यामुळे त्यांना दोन ते तीन बसगाडय़ा बदलून मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे.

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

‘पेट्रोलचा खर्च चार हजार रुपये’

ठाण्यातील देवदया नगर भागात राहणारे विवेक भांदिगरे हे अंधेरीमध्ये कामाला आहेत. रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी असल्यामुळे ते दररोज कारने घर ते कार्यालयपर्यंतचा प्रवास करतात. या प्रवासाकरिता त्यांना कारमध्ये दर आठवडय़ाला अडीच ते तीन हजारांचे पेट्रोल भरावे लागत होते. आता ४ हजार रुपयांचे पेट्रोल भरावे लागते आहे.यापूर्वी रेल्वे प्रवासासाठी दिवसाला केवळ ७० रुपये मोजावे लागत होते, असे त्यांनी सांगितले.

‘वेळेसोबत इंधनाचाही अपव्यय’

कळवा भागात राहणारे योगेश जांभेकर हे अंबरनाथ परिसरात कामाला आहेत. ते दररोज दुचाकीने कळवा ते अंबरनाथ असा प्रवास करतात. त्यासाठी त्यांना महिनाभरापूर्वी दर आठवडय़ाला ७०० ते ८०० रुपयांचे पेट्रोल लागत होते. आता १४०० रुपयांचे पेट्रोल लागते. दरम्यान, शिळफाटा किंवा रस्त्यात इतर कुठे वाहतूक कोंडी झाली तर, वेळेबरोबरच इंधन वाया जाते. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात आणखी वाढ होते. तसेच महिन्याच्या खर्चामध्ये इंधनावरच अधिकचे पैसे खर्च होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 3:27 am

Web Title: petrol diesel travelling hike price local train ssh 93
Next Stories
1 पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर ‘सीसीटीव्हीं’ची नजर
2 स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १६ जूनला
3 डोंबिवलीत बनावट कॉल सेंटरवर छापा
Just Now!
X