अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून बनावट कागदपत्रांच्या आधारे पिस्तूल विक्री झाल्याचे प्रकरण वर्षभरापूर्वी उघडकीस आले असतानाच ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेने विनापरवाना पिस्तूलप्रकरणी नुकतेच अटक केलेल्या एका तरुणामुळे कानपूरमधील ऑर्डन्सन फॅक्टरी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. या तरुणाकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल कानपूरच्या फॅक्टरीत बनविण्यात आले असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. या पिस्तूलचा त्याच्याकडे कोणताही परवाना सापडलेला नाही. त्यामुळे फॅक्टरीतून हे पिस्तूल त्याच्याकडे आले कसे, याचा सविस्तर तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे चेतन चंद्रकांत नाईक (२८) याला अटक केली आहे. कल्याण येथील सागाव परिसरात रहाणाऱ्या चेतन नाईक याच्याकडे ३२ बोअरचे भारतीय बनावटीचे पिस्तुल सापडले आहे. हे पिस्तुल विनापरवाना वापरत असल्याप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून हे पिस्तूल जप्त करण्यात आले असून या पिस्तुलावर कानपूरच्या ऑर्डन्सन फॅक्टरीचा शिक्का आढळून आला आहे. त्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीतील अधिकृत पिस्तूल त्याच्यापर्यत कसे आले याचा सखोल तपास करण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. चेतन नाईक याच्याकडे असलेले पिस्तूल चोरीचे आहे किंवा त्याने कुणाचे पिस्तूल चोरले आहे का या दिशेनेही तपास केला जात आहे. हे पिस्तूल बाळगण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता हे, अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यासंबंधीचा सविस्तर तपास सुरू आहे.

बेकायदा पिस्तूलची टोळी..
कानपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीतील पिस्तूलव्यतिरिक्त आणखी एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दुर्गेश बाळाराम म्हात्रे याला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व काडतूस जप्त करण्यात आले आहे. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलची किंमत सुमारे सव्वा लाखांच्या घरात आहे. तसेच याप्रकरणात त्याचा साथीदार अभय म्हात्रे याचेही नाव पुढे आले असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहितीही पराग मणेरे यांनी दिली.

उल्हासनगरातही पिस्तूल जप्त..
उल्हासनगर येथील देवीपाडा परिसरात राहणाऱ्या सोनू ताजी सिंग परिहार (२४) याला विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीच्या दोन पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून हे पिस्तूल बाळगण्यामागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास सुरू आहे, असेही मणेरे यांनी सांगितले.