ठिकाणे निश्चित करून बंदोबस्त व गस्त

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल चोरी करणाऱ्या फटका गँगचा उपद्रव वाढला आहे. तो रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी रेल्वे मार्गावरील फटका गँगच्या कार्याची ठिकाणे निश्चित केली असून त्या ठिकाणी बंदोबस्त आणि गस्त वाढवण्यात आली आहे.

वसई-विरार शहरातून दररोज मोठय़ा संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने ये-जा करतात. लोकलमध्ये गर्दी असल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात. अशा प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाइल किंवा पर्स लंपास करणारी ‘फटका गँग’ची टोळी सक्रिय झाली होती. यामुळे बोरिवली ते विरार यादरम्यान अनेक ठिकाणी फटका गँगने धुमाकूळ घातला होता. या फटका गँगच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी फटका मारण्याच्या घटना घडत होत्या, अशा भागात दिवस-रात्र गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

मीरा रोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलिसांची हद्द आहे. यामध्ये एकूण सात स्थानकांचा समावेश आहे. या हद्दीतील विरार नारंगी गेट, दिवा-वसई मार्ग, मीरा रोड ते दहिसर नाल्याजवळ अशा तीन ठिकाणी फटका गँगची ठिकाणे असल्याचे निदर्शनास आले आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाइलवर बोलत असतात तर काहींच्या बॅगा खांद्याला अडकवलेल्या असतात. हीच संधी रुळांजवळ दबा धरून बसलेले चोर साधतात. रुळांच्या बाजूला असलेल्या वीज खांबांजवळच किंवा झाडांमध्ये लपून बसलेले चोर लोखंडी किंवा लाकडी वस्तूने लोकलमधील प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात. यामुळे काही प्रवासी जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी दिवस-रात्र गस्त घालण्यात येत आहे.

नव्याने तयार होणाऱ्या फटका पॉइंटचे आव्हान

वैतरणा ते मीरा रोड दरम्यान वसई रेल्वे पोलिसांमार्फत लक्ष दिले जात आहेत. हातावर फटका मारून मोबाइल व इतर वस्तू घेऊन पळ काढण्याच्या घटनांसंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार विरार स्थानकाजवळील नारंगी गेट, दिवा-वसई लोकल क्रॉसिंगजवळ आणि मीरा रोड ते दहिसर येथील नाल्याजवळ असे फटका मारण्यात येणारी स्थाने निश्चित करण्यात आली आहेत. परंतु आता नुकताच वसई अंबाडी पुलाजवळ असा प्रकार होत असल्याचे समोर आल्याने या नव्याने तयार होणाऱ्या फटका पॉइंटवरही लक्ष ठेवण्यासाठीचे नवीन आव्हान समोर येऊ  लागले आहे.

 

फटका गँगमुळे ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांमार्फत दिवस-रात्र गस्त घालण्यात येत आहे तसेच याआधी ज्या काही घटना घडल्या होत्या त्याचाही शोध पोलिसांनी घेतला आहे.आणि जे नव्याने काही ठिकाणी फटाक्यांचे प्रकार सुरू होऊ  लागलेत अशा ठिकाणी पेट्रोलिंग सुरू केली जाईल. – यशवंत निकम, रेल्वे पोलीस निरीक्षक वसई