प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली सुरू

वसई : नालासोपाऱ्यातील बांधकाम व्यावसायीक राजेश पतंगे हत्याप्रकरणातील फरार आरोपीपैकी एकास पालघर स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १६ वर्षांनी अटक केली आहे. या प्रकरणात आजवर ११ आरोपींना अटक झाली असून एकाचा पोलीस चमककीत मृत्यू झाला आहे.

नालासोपारा येथील बांधकाम व्यावसायिक राजेश पतंगे यांची २५ ऑक्टोबर २००३ रोजी नालासोपारा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मीरा रोड येथील एका जागेच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण १४ आरोपी होते. त्यापैकी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र ४ आरोपी फरार होते. फरार आरोपीपैकी एकाचा मुंबई पोलिसांशी झालेल्या पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. अन्य फरार आरोपीपैकी चंद्रकाम पाटील उर्फ चंदू मामा याला मुंबईच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तर दोन आरोपी पोलिसांना चकवा देत होते.

यापैकी कमलेश जैन नावाचा आरोपी बोरिवली स्थानकात येणार असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या पथकाने  सापळा लावून जैन याला अटक केली आहे. या प्रकरणात आता केवळ एकी आरोपीला अटक व्हायची आहे.