छापे पडल्यानंतर पुनर्वापर रोखण्यासाठी पाऊल; बेकायदा बांधकामाच्या स्वतंत्र गुन्ह्य़ांसाठी प्रयत्न
जीवनाश्यक तसेच अन्य वस्तूंचे दर आकाशाला गवसणी घालत असताना ठाणे पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा करणाऱ्या साठेबाजांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. यांपैकी काहींच्या मुसक्या आवळण्यासाठी बेकायदा गोदामांचा सविस्तर तपशील मिळविण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
कृषिमालाचा अवैध साठा करताना त्यासाठी वापरात आणली जाणारी गोदामांची बांधकामे बेकायदा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अवैध साठा हुडकून काढताना बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करता येतील का, याची चाचपणीही पोलिसांनी सुरू केली आहे.
ठाणे जिल्ह्य़ास खेटूनच असलेल्या उरण-पनवेल परिसरातील जेएनपीटी बंदरात मोठय़ा प्रमाणात विदेशातून विविध प्रकारचा माल आयात होत असतो. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचाही समावेश असतो. मुंब्रा-तळोजा मार्ग, शीळफाटा तसेच भिवंडी भागात मोठय़ा प्रमाणात गोदामे असून जेएनपीटी बंदरातील माल या गोदामांपर्यंत मोठय़ा वाहनांमधून पोहचविण्यात येतो. यांपैकी काही गोदामांमध्ये कृषिमालाचा अवैधपणे साठा केला जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे पोलिसांनी तुरडाळ तसेच अन्य कडधान्यांचा साठा करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून डाळींचा बेकायदा साठा करणाऱ्या गोदामांवर धाडसत्र सुरू केले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा कारवाईनंतर साठय़ाकरिता पुन्हा गोदामांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनीही गोदामांवर वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्याचे बेत आखला आहे.
साठय़ाकरिता वापरण्यात येणारी गोदामे बेकायदा असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी आता गोदामांची बांधकामे अधिकृत की अनधिकृत याची माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मोहिमेत बेकायदा गोदामांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून संबंधित यंत्रणेला कळविण्यात येणार आहे.
संबंधित यंत्रणेला कळविणार
मुंब्रा-तळोजा मार्गालगत गोदामांवरील कारवाईच्या पाश्र्वभूमीवर या गोदामाचे बांधकाम बेकायदा आहे का, असा प्रश्न सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना पत्रकारांनी विचारले असता, गोदामांची बांधकामे तपासण्यात येतील आणि त्यानुसार संबंधित यंत्रणेला कारवाईसाठी कळविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘लेडीज बार’सारखीच कारवाई
ठाणे पोलिसांनी मध्यंतरी शहरातील लेडीज बारमधील बेकायदा बांधकामांची अशाच प्रकारे माहीती गोळा केली होती. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने बेकायदा बारची बांधकामे जमिनदोस्त केली होती. बारवर कारवाई करताना या व्यवसायाचा पाया उखडला जावा, असा उद्देश या कारवाईमागे होता. हीच पद्धत कृषिमालाच्या बेकायदा साठवणूदारांविरोधात वापरण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मुंब्रा-तळोजा मार्ग, शीळफाटा तसेच भिवंडी भागातील बेकायदा गोदामे पोलिसांचा नव्याने शोधही यानिमित्ताने घेतला जात आहे.