ठाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान जागर परिषदेस कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरून ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देण्यावरून काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात रविवारी सायंकाळी पाच वाजता ‘तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय’ या विषयावर  चर्चासत्र होणार होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्ञानेश महाराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड, श्रीमंत कोकाटे, प्रतिमा परदेशी यांचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे ठाण्यातील संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडसह १८ विविध संघटनांकडून आयोजन करण्यात आले होते. डॉ. घाणेकर नाटय़गृहाच्या प्रशासनाने चर्चासत्रासाठी पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी ती नाकारली.