पाऊस कमी झाला की शहरातील खड्डे डांबर, बारीक खडीचा वापर करून भरण्यात येतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे कल्याण, डोंबिवलीच्या अनेक भागांतील खड्डे माती, बारीक खडी वापरून ठेकेदारांकडून भरण्यात येत आहेत. ही माती आणि खडी सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पसरत आहे. यामधून दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कल्याणमध्ये जेट पॅचरचा वापर करून खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील खड्डे भरण्यास दिवाळी उजाडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डोंबिवली एमआयडीसी, २७ गावांच्या परिसरात तर रस्ते शोधून वाहन चालक, नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. एमआयडीसीत कच्चा माल घेऊन येणारी अवजड वाहने खराब रस्त्यांमुळे संबंधित कंपनीच्या जवळ ट्रक नेऊन माल उतरून देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कंपनी मालकांना मुख्य रस्त्यावर चांगल्या रस्त्यावर ट्रक उभा करून तेथून लहान वाहनाने माल कंपनीजवळ आणून उतरवावा लागत आहे.
कल्याणमधील संतोषी माता रस्ता, मुरबाड रस्ता, दुर्गाडी रस्ता, लालचौकी, खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय, आधारवाडी, श्री कॉम्प्लेक्स, सापाड, उंबर्डे, मोहने, टिटवाळा भागांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील शिवाजी नगर ते मानपाडा, अभिनव विद्यालय परिसर, आजदे, रामनगर, दत्तनगर, दीनदयाळ रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवर बारीक खडी आणि माती टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत. गेल्या महिन्यात शहर अभियंता पाटीलबुवा उगले यांनी पावसाचे प्रमाण कमी झाले, की तातडीने खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात येतील, असे सांगितले होते. त्याप्रमाणे कल्याणमध्ये वायलेनगर भागात जेटपॅचरच्या साहाय्याने खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. गणेशोत्सव ऐन तोंडावर असताना खड्डे भरण्याची कामे मात्र संथगतीने सुरू आहेत.