कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील नागरिक हैराण 

ऑक्टोबर सुरू होताच पारा पस्तीशीपार गेला असतानाच महावितरणने काही भागांत अघोषित वीजकपात सुरू केले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजकपातीचे कोणतेही वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे रहिवाशांच्या दैनंदिन कामांत अडथळे येत आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील रहिवाशांत वीजकपातीमुळे संतापाचे वातावरण आहे.

राज्याला सध्या साधारणत: ७०० मेगाव्ॉट विजेचा तुटवडा भासत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोळशाच्या तुटवडय़ामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे महावितरण कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणाविषयी ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. वापरापेक्षा अधिक देयक आकारणे देणे, देयक भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना ‘सव्‍‌र्हर डाऊन’ असल्याने तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागणे अशा अनेक तक्रारी येत आहेत. मुंब्रा, दिवा, कळवा शहरांना भारनियमनाचा अधिक फटका बसला आहे. या परिसरात दिवसभरात तब्बल सहा तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात साधारण १०० मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. सध्या वीज टंचाईमुळे ज्या भागांतील विजेची मागणी वाढेल, त्या भागात त्या वेळी वीजपुरवठा खंडीत केला जातो. त्याचे कोणतेही वेळापत्रक नाही. मात्र ही वीजकपात तात्पुरत्या स्वरूपातील असून टप्याटप्याने ते कमी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नौपाडा, पाचपाखाडीतही तीच समस्या

ठाणे शहरातील नौपाडा, जांभळी नाका, पाचपाखाडी या भागांतही भारनियमन होत आहे. त्यामुळे ठाण्यातील व्यापारी केंद्र असणाऱ्या नौपाडा आणि पाचपाखाडी परिसरातील व्यवसायिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. सोमावरी सकाळी जांभळी नाका परिसरातील वीज दोन तास खंडित करण्यात आली होती, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. गेले दोन दिवस सतत वीज जात असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली. मात्र महावतिरणाच्या अधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील कोणत्याही भागात भारनियमन सुरू नसल्याचे स्पष्ट केले. मुंब्रा, दिवा, कळवा या परिसरात मात्र भारनियमन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. विजेची मागणी वाढल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जात असला, तरी महावितरणने भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होणार नाही.   – प्रसाद राणे, कळवा