ठाणे : करोना चाचणीचा अहवाल नसल्याचे सांगत मुंब्रा येथील खासगी रुग्णालयांनी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल न करून घेतल्याने या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिलाल, प्राइम क्रिटीकेअर आणि युनिव्हर्सल या रुग्णालयांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरात आस्मा मेंहदी (२६) या राहतात. त्या गर्भवती होत्या. २६ मे ला त्यांना अचानक पोटात कळा जाणवू लागल्या. नातेवाईकांनी त्यांना रिक्षातून कौसा येथील बिलाल रुग्णालयात नेले. मात्र करोना चाचणीचा अहवाल नसल्याचे सांगत, या रुग्णालयाने त्यांना उपचारासाठी दाखल केले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना प्राइम क्रिटीकेअर या रुग्णालयात नेले. तिथेही त्यांना करोना चाचणीचा अहवाल नसल्याचे कारण देत दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. अखेर पोटातील वेदना सहन न झाल्याने त्यांचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात रुग्णालयांच्या या कारभाराविषयी नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. तर २५ मे ला मेहेक खान (२२) यांच्यासोबतही असाच प्रकार झाला. करोनाचा चाचणी अहवाल नसल्याने त्यांना मुंब््रय़ातील युनिव्हर्सल रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला होता. अखेर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. या तिन्ही रुग्णालयांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.