ठाणे नागरिक मंचच्या माध्यमातून बैठका सुरू

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर चर्चा घडवून एक अराजकीय दबाव गट निर्माण व्हावा या हेतूने काही जागृत नागरिकांनी एकत्र येत ठाणे नागरिक मंचची स्थापना केली असून त्यांच्या नियमित साप्ताहिक बैठकाही सुरू झाल्या आहेत.

सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देणारे शहर अशी ठाण्याची राज्यभरात ख्याती आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवणारी अनेक व्यक्तिमत्त्वे ठाण्यात राहतात. मात्र दुर्दैवाने स्थानिक प्रशासनात त्याचे फारसे प्रतिबिंब उमटत नाही. महापालिकेत वर्षांनुवर्षे ठरावीक व्यक्ती अथवा कुटुंबांचा प्रभाव असतो. शहरातील जवळपास सर्वच राजकीय पक्ष व्यक्तिकेंद्री आहेत.

नागरिकांच्या हिताच्या अनेक मुद्दय़ांबाबत राजकीय पक्ष कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहत असल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जाते.

त्यामुळे किमान येत्या निवडणुकीत त्यांनी सक्रिय व्हावे, त्यांनी आपली मते मांडावीत, त्यासाठी ठाणे नागरिक मंचचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नागरिक मंचच्या दोन बैठका गडकरी रंगायतनच्या प्रांगणात झाल्या. त्यात महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेविषयी सविस्तर चर्चा झाली. आता दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता मो. ह. विद्यालयात मंचची बैठक होणार आहे.

पुढील बैठक ६ जून रोजी संध्याकाळी सात वाजता होईल. या बैठकीत उपस्थित राहून नागरिकांनी आपापल्या विभागातील महत्त्वाच्या समस्यांविषयी मते मांडणे अपेक्षित आहे. शहर नियोजन आणि विकास या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सुलक्षणा महाजन, चंद्रशेखर प्रभू यांना निमंत्रित केले जाणार आहे.

डॉ. वामन काळे, राजेश गडकर, उन्मेश बागवे, महेंद्र मोने आदींनी मंच स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून विविध विभागांतील जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केला जात आहे.