करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच आता महापालिकेचे अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून मालमत्ता करामध्ये विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षांचा संपूर्ण मालमत्ता कर १५ सप्टेंबपर्यंत एकत्रित भरला तर संबंधित करदात्याला दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात दहा टक्के सवलत मिळणार आहे.

गेल्या चार महिन्यांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात महापालिका यंत्रणा व्यस्त असून यामुळे महापालिकेला मालमत्ता कर आणि पाणी देयकांचे वाटप करणे शक्य झालेले नाही. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करासह पाणी देयकांची वसुली होऊ शकलेली नाही. यामुळे महापालिकेचे आर्थिक चक्र बिघडल्याचे चित्र असून या पार्श्वभूमीवर आता कर वसुलीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणेकरांना मालमत्ता करामध्ये विविध सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार २०२०-२१ या वर्षांचा संपूर्ण मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी १५ सप्टेंबपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

१६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण कर भरल्यास ४ टक्के, १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कर भरला तर ३ टक्के आणि १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कर भरला तर २ टक्के सवलत देण्यात येणार आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

ई-सुविधा..

करोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे मालमत्ता कराची देयके वितरित करण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे करदात्यांनी महापालिकेच्या ई-सुविधेद्वारे मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.