शिळफाटा रुंदीकरणासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव; नागरिकांच्या हरकतींनंतर निर्णय

कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणाचे काम ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’कडून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी या रस्तेमार्गात अडथळा ठरणारी १ हजार ४० मोठी झाडे तोडण्याची परवानगी महामंडळाने कल्याण डोंबिवली पालिकेकडे मागितली आहे. रस्त्याला बाधित होणारी झाडे तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी नागरिक, पर्यावरणप्रेमी नागरिकांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ते पालिकेकडे मांडण्याचे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे.

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील देसाईखाडी ते दुर्गाडी चौक या पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्यात येणार आहे. दीड वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाढती वाहनसंख्या, नेहमीची वाहतूक कोंडी विचारात घेऊन शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणाला शासनाने मंजुरी दिली आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करणार आहे. रुंदीकरण करताना १ हजार ४० झाडे या रस्त्याच्या दुतर्फा असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ही झाडे तोडल्याशिवाय रुंदीकरण होणे शक्य नसल्याने महामंडळाने पालिकेकडे ही झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. यामधील झाडांचे पुनरेपण करण्यात येणार आहे. ही झाडे तोडण्यापूर्वी शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमींची याविषयीची मते, हरकती समजून घेण्यासाठी पालिकेने या झाडांवर हरकतीच्या नोटिसा लावल्या आहेत. नागरिकांच्या हरकती ऐकून घेतल्यानंतर प्रशासन वृक्ष प्राधिकरण समितीसमोर हा प्रस्ताव ठेवील. समितीच्या मंजुरीनंतर ‘एमएसआरडीसी’ला झाडे तोडण्याची परवानगी पालिकेकडून देण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

झाडे तोडण्याची प्रक्रिया विहित व कायदेशीर मार्गाने व्हावी म्हणून पालिकेने नागरिकांच्या हरकती सूचना मागवल्या आहेत. हरकती सूचनांची दखल घेतल्यानंतर, वृक्ष प्राधिकरण समितीसमोर हा विषय ठेवण्यात येईल. त्यानंतर झाडे तोडण्याच्या मंजुरीचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात येईल. झाडे तोडण्याची परवानगी देताना एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे ही अट असेल. एका झाडाच्या बदल्यात पंधरा हजार रुपये महामंडळाकडून प्रक्रियेचा भाग म्हणून घेण्यात येतील.

– संजय जाधव, अधीक्षक,उद्यान विभाग, कडोंमपा