पथकर नाक्यावर वाहनांच्या रांगा; काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे भिवंडीत वाहतूक विस्कळीत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीप्रकरणी भिवंडीतील दिवाणी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी आलेले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे मंगळवारी सकाळी ठाण्यासह आसपासच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. राहुल यांच्या ताफ्याला जलदगतीने मार्गक्रमण करता यावे, यासाठी आनंदनगर येथील पथकर नाक्यावर मार्गिका राखून ठेवण्यात आल्यामुळे अन्य मार्गिकांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळीही अशीच परिस्थिती उद्भवली होती.

गत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी भिवंडीतील दिवाणी न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. राहुल यांच्या सुरक्षेसाठी मुंबई ते भिवंडीदरम्यानच्या मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राहुल यांच्या वाहनांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकू नये, याकरिता आनंदनगर येथील पथकर नाक्यावरील एक मार्गिका सुमारे तासभर आधीपासून अन्य वाहनांकरिता बंद ठेवण्यात आली होती. याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर दिसून आला. मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या वाहनांना काही काळ तसेच खोळंबून राहावे लागले होते. ऐरोली पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच ऐन गर्दीच्या वेळेस कार्यालयात पोहचणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुभाजकांद्वारे मार्गिका काढून वाहनांना मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येत होते.

पथकर नाक्यावर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राहुल यांना पुष्पगुच्छ, फुले, हार देण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, राहुल यांचे सुरक्षारक्षक तसेच पोलिसांनी ही गर्दी पांगवली. मात्र, राहुल यांचा ताफा माजिवाडा पुलावर पोहोचेपर्यंत इतर वाहने तीन हात नाका, नितीन कंपनी तसेच कॅडबरी नाका येथे रोखून धरण्यात आली होती. सेवारस्त्यांवरील वाहतुकीलाही मुख्य मार्गावर येण्यापासून रोखण्यात आल्याने संपूर्ण ठाण्यात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

भिवंडी न्यायालयाबाहेरील एक बाजूचा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तर दुसऱ्या बाजूचा रस्ता मात्र वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता. मात्र या मार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली

होती. त्यामुळे येथील वाहतुकीचा पुरताच बोजवारा उडाल्याचे चित्र होते.

फटाक्यांची आतषबाजी

आनंदनगर पथकर नाक्यावर राहुल गांधी यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले. भर रस्त्यात फटाक्यांच्या माळा लावल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते.  इतर प्रवाशांनाही फटाक्यांच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागला.