tvlogमराठी वाड्:मयाने अनेक पक्ष्यांना, त्यांच्या सवयींना सामावून घेतलयं, इतकं की कट्टयावरचे दोस्त चहावाल्याने १० मिनीट चहा उशिराने आणला तरी ‘तुझी चातकासारखी वाट पहात होतो’ असं म्हणायला कमी नाही करत. ही गोष्ट वेगळी की चहावाला आम्ही लोक मोरासारखे नाचलो तरी चहा त्याच्या सवडीनेच आणून देतो..असो!

चंदेरी आणि म्हसमाळ डोंगरांमधल्या घळीत पक्षीनिरीक्षणासाठी फिरत होतो. ‘मान्सून बर्डिग’ हे काही ‘विंटर बर्डिग’ इतके हॅपनिंग नसते. तरीही काही विशिष्ट पक्षी याच कालावधीत दिसतात.
चातक आणि इतर दोन जातींचे कक्कू जंगलात कॉलिंग करत होते. बाह्य़ जंगल मात्र निवांत होते. एका छोटय़ा ओढय़ापाशी बसून आम्ही निसर्ग ट्रस्टचे काही उपद्वयापी लोक नवीन काही आवाज येतोय का, हे चाचपत होते. आणि एका क्षणाला जमिनीपासून दोन फुटांवर एका काडीवर जंगलातले रत्न उडत येऊन बसले. आम्ही शांतपणे निरीक्षण करू लागलो. एक-दोघांनी कॅमेरे सरसावले.
गडद निधी पाठ, डोक्यावरचा रंग जणू इंद्रधनुष्य, छाती नारिंगी, पिवळी चोच असा बहुरंगी खंडय़ा पक्ष्याच्या जातीतील छोटा पावसाळी पाहुणा, तिबेटी खंडय़ा, आमच्या समोर होता. इंग्रजीत याला ‘ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर’ असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘सीईक्स एरीथॅकस’ असे आहे. सीईक्स हे ग्रीक पुराणातल्या एका राजाचे नाव आहे जो खंडय़ा पक्ष्याचे रूप घेऊ शकेल आणि एरीथॅकस या ग्रीक शब्दाचा अर्थ लालसर छाती असणारा, उडणारा पक्षी. यातूनच आपल्याला या पक्ष्याच्या रूपाची कल्पना येते.
पावसाळ्यात आपल्याला ठाणे जिल्हा, कोंकण परिसरात हे पक्षी विणीसाठी येतात. जंगलातल्या मऊ मातीच्या कडय़ावर बीळ तयार करून त्यात हे पक्षी अंडी घालतात. हे पक्षी जंगलात राहणारे असल्याने इतर खंडय़ा पक्ष्यांप्रमाणे मत्स्याहारी न राहता हे पक्षी पाली, खेकडे, छोटे बेडूक, कीटक, नाकतोडे हे सर्वदेखील खातात.
पावसाळ्याच्या तोंडावर जंगलाला लागून असलेल्या लोकवस्तीत स्थलांतरामुळे दमलेल्या अवस्थेतील तिबेटी खंडय़ा आढळल्याच्या तुरळक घटना घडतात. साधारण चिमणीच्या आकाराचे हे खंडय़ा पक्षी शांतताप्रिय आणि स्वभावाने लाजरे असतात. कावळे, शिक्रा किंवा इतर शिकारी पक्ष्यांपासून स्वत:चे आणि पिल्लांचे रक्षण करण्यासाठी लपून राहणे हेच तंत्र त्यांच्यापाशी असते. याचे घरटे असलेले बीळदेखील दुसऱ्या मोठय़ा शिकारी पक्ष्याने त्यात चोच घातली तरी पिल्ले तावडीत सापडू नयेत म्हणून सुमारे १ मीटर खोल खणलेले असते.
मधल्या काळात झालेली प्रचंड जंगलतोड, मातीचा वीटभट्टीसाठी केलेला चोरटा व्यापार यामुळे या पक्ष्याच्या वसतिस्थानांवर फार मोठा आघात झाला आहे. त्याच जोडीला मुंबई आणि परिसरात पक्षीमित्रांची संख्यादेखील वाढली आहे. दुर्दैवाने काही पक्षीमित्र पक्षीनिरीक्षणाची काही तत्त्वे पाळत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्साहाचा पक्षाला त्रास होऊ नये हे पाळत नाहीत. छायाचित्रे काढण्याच्या नादात त्यांच्या घरटय़ांच्या स्थानांना नुकसान पोहोचवतात. या नव्या संकटातून सावरून अजून तरी हे पक्षी आपल्याकडे विणीसाठी (प्रजननासाठी) येत आहेत.
चला तर, या वर्षांपासून तत्त्वनिष्ठ पक्षीनिरीक्षण करू. या छंदाला निकोप ठेवू आणि पुढची अनेक वर्षे आपल्या कोंकणात येणाऱ्या या पाहुण्याचे स्वागत करू. त्याला संरक्षण देऊ.