वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा, दिवा, राबोडी अंधारात

ठाणे शहरात कोसळलेल्या पहिल्याच पावसात महावितरण कंपनीचेही पितळ उघडे पडले असून वृंदावन, राबोडी, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, डवलेनगर, परेरानगर, बाळकुम, लोकपुरम, कळवा, दिवा तसेच भिवंडीच्या काही भागांत आठ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील रहिवाशांचे हाल झाले. पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेने केलेल्या रस्तेकामांमुळे विजेच्या भूमिगत वाहिन्यांना धक्का पोहोचल्याने हा प्रकार घडला, असा दावा महावितरण कंपनीमार्फत केला जात असून या दोन प्राधिकरणाच्या वादात रहिवाशांना मात्र तासन्तास विजेविना काढावे लागत असल्याचे चित्र आहे.

शहरातील विविध भागांत सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना वाटेत पावसाशी सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले. पुन्हा घरी गेल्यावर अनेकांना वीजपुरवठा ठप्प झाल्यामुळे त्रास सहन करावा लागला. सोमवारी ९ वाजल्यापासून पावसाला सुरुवात होताच शहरातील जुने ठाणे आणि नवीन ठाणे या दोन्ही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ लागला. वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, यशोधन नगर, ज्ञानेश्वर नगर, सावरकर नगर या भागांत ९ वाजता वीजपुरवठा ठप्प झाला होता. तीन तासांनंतर या भागातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. परेरा नगर आणि शास्त्रीनगर येथील काही भागांमध्ये रात्री ९ नंतर खंडित झालेला वीजपुरवठा हा दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पूर्ववत झाला नव्हता.

घोडबंदर येथील कासारवडवली, माजिवडा, पातलीपाडा येथील काही भागांत एक तासासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकपूरम भागात रात्री साडेनऊ ते साडेदहा या एक तासाच्या कालावधीकरिता वीजपुरवठा ठप्प झाला होता. बाळकुम भागात रात्री नऊ ते साडेबारा या कालावधीत वीजपुरवठा ठप्प झाला होता. वृंदावन, शिवाजीनगर, राबोडी या भागांतही रात्री सव्वानऊ वाजता वीजपुरवठा ठप्प झाला. त्यानंतर तीन तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. काही वेळाने रात्री साडेबारा वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत विजेचा लंपडाव या भागात सुरू राहिल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. या भागात पर्यायी यंत्रणांद्वारे (रिंग सिस्टीम) वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कळवा येथील सवरेदय संकुल परिसर तसेच खारेगाव भागात रात्री नऊच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. एक तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. महापालिकेने पावसाळ्याअगोदर शहरातील अंतर्गत आणि मुख्य मार्गावर रस्ता काँक्रीटीकरण आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. या कामांदरम्यान भूमिगत विद्युतवाहिन्यांना धक्का लागला. परिणामी सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे य्शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला.

कल्याण, डोंबिवलीतही वीजपुरवठा खंडित

शहापूर भागात जोरदार वाऱ्यामुळे दोन उच्च विद्युतवाहिन्या पोल पडण्याचे प्रकार घडले. डोंबिवली भागातही काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण येथे ९ उच्च विद्युतवाहिन्या पोल, १ डीपी स्ट्रक्चर आणि ८ विद्युत एलटी पोल पडले. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी केबल तुटल्याच्या घटना उघडकीस आल्या.

महावितरणाकडून आवाहन

पावसाळ्यामध्ये विजेच्या समस्या उद्भवल्यास वीज ग्राहकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी ग्राहकांनी मोबाइल क्रमांक महावितरणाकडे नोंदवावा. त्याचबरोबर १८००२३३३४३५ आणि १८००१०२३४३५ या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवल्यास तक्रारींचे निवारण केले जाईल, असे आवाहन महावितरणाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

विविध तांत्रिक कारणांमुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता महावितरण सज्ज आहे.   – विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, महावितरण