ठाणे : ठाणे जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाचा फटका बसला. पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसाने ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरांत दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. कल्याण आणि मुंब्रा परिसरात भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या.

नवी मुंबईतही अनेक ठिकाणी पाऊस साचले होते. बेरापूर, वाशी, महापे, ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे येथील भुयारी मार्गात पाणी साचले होते. मात्र महापालिकेकडून तात्काळ पाणीउपसा करण्यात आला. शहरात काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनाही घडल्या.

पालघर, वसई-विरार जलमय

वसई : मुसळधार पावसाने वसई- विरार शहरातील अनेक ठिकाणे जलमय झाली.  नालेसफाई न झाल्याने अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर आले होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पावसामुळे संथगतीने सुरू होती.

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी  परिसरांत पावसाचा जोर अधिक होता. मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड भागांत सकाळच्या सत्रात पाऊस पडला. दुपारनंतर पावसाच्या सरी कमी झाल्या.   पालघर-बोईसर रस्त्यावर नवीन जिल्हा कार्यालय संकुलासमोर पुलाचे काम अंतिम टप्प्यात  असून या मार्गावर तयार केलेला पर्यायी मार्ग मुसळधार पावसात  वाहून गेला.